मुंबई  : मुंबईत पर्यटनासाठी आलेल्या औरंगाबादमधील एका कुटुंबातील आठ वर्षांची मुलगी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाला खेटून असलेल्या भुयारी मार्गातील गर्दीत हरवली. मात्र एका महिला सहाय्यक उपनिरीक्षकाच्या प्रसंगावधानामुळे या मुलीची पालकांशी काही अवधीतच पुनर्भेट झाली. पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांचे प्रयत्नही यासाठी कामी आले.

सकाळच्या सुमारास भुयारी मार्गात पाठीवर काळी बॅग लावलेली, घाबरलेली आणि रडत असलेली एक लहान मुलगी एकटी फिरताना सहाय्यक उपनिरीक्षक चेतना औतगाडे यांना दिसली. त्यांनी मुलीला धीर देत शांत केले. तिची विचारपूस केली तेव्हा ती आई-वडील, काका-काकी यांच्यासोबत मुंबईत फिरण्यासाठी आली होती; मात्र गर्दीत ती त्यांच्यापासून दूर गेली. स्वतःची संपूर्ण माहिती सांगता न आल्याने ती अधिकच घाबरली. श्रीमती औतगाडे यांनी जातीने तिची काळजी घेतली आणि याबाबत वरिष्ठांना कल्पना दिली. मुलगी हरवल्याबाबत कोणीतरी विचारणा निश्चितच करील, याची पोलिसांना खात्री होती. त्रयस्थ व्यक्तीच्या हाती लागण्याआधीच सहाय्यक उपनिरीक्षक औतगाडे यांनी तिला आजाद मैदान पोलीस ठाण्यात आणले.

ही बाब पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या कार्यालयाच्या निदर्शनास आल्यानंतर, मंत्री कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी कृष्णदर्शन जाधव यांनी पोलिस यंत्रणांना संपर्क आणि समन्वय साधला. पोलिसांनी तात्काळ रेल्वे आणि मेट्रो परिसरात शोधमोहीम वेगाने राबविली.  रेल्वे स्थानकावर तसेच मेट्रो परिसरात सातत्याने उद्घोषणा करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे यांच्या पथकाने भुयारी मार्ग आणि रेल्वे स्थानक परिसरात शोधमोहीम सुरू केली. अखेरीस ती मुलगी आझाद मैदान पोलीस ठाणे येथे असल्याचे निष्पन्न झाले. काही वेळातच मुलीचे वडील आणि काका तेथे पोहोचले. ओळख पटताच त्या चिमुरडीला सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

औरंगाबादहून मुंबई पाहण्यासाठी आलेल्या या कुटुंबासाठी काही क्षणांचा हा काळ जरी भीतीदायक होता, तरी शेवटी मुलगी सुखरूप परत मिळाल्याने त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू  आले. हरवलेली मुलगी आई-वडिलांच्या कुशीत परत येताच परिसरातील वातावरणही भावूक झाले.

मुंबई पोलिसांची सतर्कता, संवेदनशीलता आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे एका अल्पवयीन मुलीचा लगेच शोध लागला. मुंबई पोलिसांच्या महिला सहाय्यक उपनिरीक्षक  चेतना पाटील, संबंधित अधिकारी व संपूर्ण पोलिस पथकाचे पालकांनी आभार मानले. पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनीही महिला सहाय्यक उपनिरीक्षक औतगाडे यांना फोन करुन कौतुक केले. पोलीस आयुक्त देवेन भारती यांनीही पोलीस पथकाने दाखवलेल्या कर्तव्य तत्परतेचे कौतुक केले आहे.