काही दिवसांपूर्वी एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादेत येऊन औरंगजेबच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं. या मुद्यांवरून भाजपानं महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर बोचरी टीका केली होती. आज संजय राऊत यांनी बीकेसी मैदानावरून भाजपावर पलटवार केला आहे. औरंगजेब हा गुजरातेत जन्मला अन् त्याला महाराष्ट्रात गाडला, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपावर तोंडसुख घेतलं आहेत.

त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, हिंदवी स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. ते नष्ट करू पाहाणाऱ्या औरंगजेबाशी संभाजी महाराजांनी लढा दिला. शिवसेनेचं हिंदुत्व त्या छत्रपती संभाजीराजांसारखं आहे. धर्मासाठी, देशासाठी प्राण जाए, पर वचन ना जाए. हिंदुत्वाचा पराभव होऊ देणार नाही. औरंगाबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीपुढे ओवेसी गुडघे टेकतो, हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान आहे. पण ताबडतोब भाजपाची पिलावळ उठली आणि त्यांनी सरकारला स्वाभिमान आहे की नाही? असा प्रश्न केला.

पण मी तुम्हाला सांगतो, २०१४ पासून ओवेसी महाराष्ट्रात येत आहे. काँग्रेसच्या काळात, फडणवीसांच्या काळात आत्तापर्यंत किमान २० वेळा तो औरंगजेबाच्या कबरीपुढे गेला, तेव्हा हा महाराष्ट्राचा अपमान वाटला नाही का? औरंगजेबाचा जन्म गुजरातमधील दाहोदमध्ये झाला. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या महाराष्ट्रात जन्माला आले. महाराष्ट्रात सातत्याने आक्रमणं का होत आहेत. गुजरात आणि महाराष्ट्रात जन्मलेल्यांमध्ये हा संघर्ष सुरू आहे. जे छत्रपतींनी तेव्हा भोगलं, ते महाराष्ट्र आज भोगतोय.

आज काश्मीरमधला हिंदू सगळ्यात जास्त धोक्यात आहे. गेल्या ३ महिन्यात २७ कश्मिरी पंडितांची हत्या झाली आहे. परवा दुपारी ३ वाजता राहुल भट या सरकारी कर्मचाऱ्याच्या कार्यालयात अतिरेकी घुसले, सगळ्यांसमोर त्यांना गोळ्या घातल्या आणि अतिरेकी निघून गेले. आज आणि काल काश्मिरी पंडित हत्येचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले, तेव्हा केंद्राच्या पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

काश्मीरमध्ये पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजतेय हे लक्षात घ्या. हिंदुत्व धोक्यात कुणामुळे आलंय हे तपासायची गरज निर्माण झाली आहे. शिवसेनेवर बोटं दाखवू नका, शाहिस्तेखानाप्रमाणे तुमचीही बोटं छाटली जातील एवढी ताकद शिवसेनेत आहे, असंही संजय राऊत यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.