कामाच्या व्यापातून झालेल्या चुकीनेच ‘फर्गसन’ महाविद्यालयाच्या प्राचार्यानी विद्यार्थ्यांकडून देशविरोधी घोषणा दिल्या होत्या, असे पत्र पोलिसांना दिले होते. पण लगेचच दुसऱ्या दिवशी तशा घोषणा दिलेल्या नाहीत, असे नमूद करणारे पत्र दिले. त्याच दिवशी पहिले पत्र मागे घेत असल्याचे पोलिसांना कळविले आहे. या साऱ्या प्रकरणाची संस्थेकडून चौकशी सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
‘फर्गसन’ महाविद्यालयातील घोषणाबाजी, चवदार तळ्याचे शिवसेना आमदाराकडून झालेले शुद्धीकरण, मंत्रालयासमोर शेतकऱ्याने केलेली आत्महत्या यावरून दोन दिवस विरोधकांनी सरकारची कोंडी केली होती. लागोपाठ दुसऱ्या दिवशीही या तीन विषयांवरून विधानसभेत गदारोळ झाला आणि त्यातून सभागृहाचे कामकाज आठ वेळा तहकूब करावे लागले. या तिन्ही विषयांवर निवेदन करीत मुख्यमंत्र्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, पण विरोधकांचे समाधान झाले नाही. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनात काहीच ठोस नसल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

चवदार तळ्यावरून शिवसेनेला अभय
चवदार तळ्यात शिवसेनेचे आमदार भारत गोगावले यांनी कोणत्याही प्रकारचे शुद्धीकरण केलेले नाही व या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पाण्याची बचत, जलप्रबोधन यासाठी जनजागृती सप्ताह राज्यभर साजरा करण्याचा आदेश राज्य शासनाने दिला होता. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्य़ात जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाडमध्ये चवदार तळ्यात जलपूजन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात काहीही चूक झालेली नाही, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेला सांभाळून घेतले.