राज्यभरातील रद्द झालेल्या ऑटोरिक्षांच्या परवान्यांचे फेरवाटप करण्यासाठी पहिल्यांदाच ऑनलाइन अर्ज स्वीकारणाऱ्या परिवहन आयुक्तालयातर्फे बुधवारी या परवान्यांसाठी सोडत काढण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘रन लॉटरी’ या बटणावर क्लिक करताच समोरच्या स्क्रीनवर एक ‘रिक्षा धावू’ लागली. सोडत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही ‘रिक्षा’ थांबली आणि नागपूर व औरंगाबाद येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील परवान्यांमधून भाग्यवान अर्जदारांची नावे समोर आली. त्यानंतर परिवहन विभागाच्या अंधेरी येथील कार्यालयातून इतर विभागांची सोडत जाहीर करण्यास सुरुवात झाली.
सोडत प्रक्रिया पारदर्शक व नि:पक्षपाती असावी, याची खातरजमा करण्यासाठी चार सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. यात माजी उप लोकायुक्त सुरेश कुमार,  माहिती व तंत्रज्ञान संचालक विरेंद्र सिंह, अपर परिवहन आयुक्त सतीश सहस्रबुद्धे आणि संबंधित जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किंवा प्रतिनिधी यांचा समावेश होता. आता ही प्रक्रिया चालकांसाठी सोयीची असून परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांनीही ही ती फायदेशीर ठरणार असल्याचे सांगितले.