मुंबई : मराठी भाषा शिकण्यासाठी अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कोणतीही अतिरिक्त मुदतवाढ दिली नाही, अशी स्पष्ट माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. अमराठी चालकांना १५ प्रश्नांची उत्तरे न आल्यास चालकांना पहिल्या टप्प्यात एक महिन्याची रीतसर नोटीस बजावण्यात येत आहे. त्यानंतर मराठीचे आवश्यक ज्ञान प्राप्त न केल्यास चालकाचा बॅज पुढील ३ महिन्यांसाठी निलंबित केला जाईल. निलंबनाच्या ३ महिन्यांच्या काळातही जर त्यांनी मराठी भाषा शिकण्यास नकार दिला किंवा ती शिकले नाहीत, तर त्यांची रीतसर सुनावणी घेऊन त्यांचा अनुज्ञप्ती (लायसन्स) कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, असे सरनाईक यांनी सांगितले.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ नुसार विद्युत मीटर बसवलेल्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठीचे मूलभूत ज्ञान असणे बंधनकारक आहे. तपासणीत मराठीचे आवश्यक ज्ञान नसल्याचे आढळलेल्या चालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे. नोटीसनुसार संबंधित चालकाने एका महिन्याच्या आत आरटीओ कार्यालयात मराठी भाषेची मूलभूत ज्ञान चाचणी द्यावी लागणार आहे. मराठी तोंडी परीक्षेत उत्तीर्ण न झाल्यास, बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाणार असून, त्यानंतरही सुधारणा न झाल्यास अनुज्ञप्ती कायमचा रद्द करण्याची तरतूद आहे.
भाषा प्रशिक्षण उपक्रम यापुढेही
”मराठी भाषा शिकायची कुठे ?” अशा आशयाचे वृत्त २५ ऑगस्ट रोजी ”लोकसत्ता”मध्ये प्रकाशित झाल्यानंतर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांची दखल घेत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम पुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात रिक्षा व टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
या उद्देशाने परिवहन विभागाच्या सामाजिक बांधिलकीतून राबविलेल्या १०५ दिवसांच्या विशेष उपक्रमाद्वारे राज्यातील सुमारे १ लाख ६५ हजार ८०० रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
ज्या रिक्षा-टॅक्सी चालकांना अद्याप मराठी भाषेचे प्रशिक्षण घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून कार्यशाळा सुरू ठेवण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, भिवंडी, नालासोपारा, वसई-विरार व नवी मुंबई या भागांतील प्रशिक्षण केंद्रांची यादी संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. प्रशिक्षण केंद्रांची माहिती मिळण्यासाठी आरटीओच्या माध्यमातून स्वतंत्र संपर्क क्रमांक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सरनाईक यांनी सांगितले.
