मुंबई : रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी देण्यात आलेली १५ ऑगस्टची मुदत वाढविण्यात येण्याची शक्यता अत्यंत कमी असून, त्यानंतर नियमांची कठोर अंमलबजावणी होण्याची चिन्हे आहेत. मराठी भाषा प्रशिक्षण मोहिमेचा अधिकृत समारोप १७ ऑगस्ट रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे** होणार असून **१८ ऑगस्टपासून मराठीचे मूलभूत ज्ञान नसलेल्या अथवा प्रशिक्षण पूर्ण न केलेल्या चालकांवर विशेष पथकांमार्फत कारवाई केली जाण्याची शक्यता** आहे.
राज्य शासनाने अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी १५ ऑगस्टपर्यंत मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य केले आहे. या निर्णयानंतर राज्यभरात मराठी भाषा प्रशिक्षण वर्गांना मोठा प्रतिसाद मिळाला. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने राज्यातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यांत प्रशिक्षण वर्ग राबविण्यात आले असून त्यात मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत राज्यभरातील सुमारे ९८ हजार चालकांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली.
प्रशिक्षण अधिक सुलभ व्हावे यासाठी सुरुवातीला तयार करण्यात आलेल्या सुमारे २०० पानांच्या अभ्यासक्रमाऐवजी दैनंदिन व्यवहारासाठी उपयुक्त दोन पानांचा सोपा अभ्यासक्रम तयार करण्यात आला. चालकांच्या कामाच्या वेळांचा विचार करून दुपारच्या विश्रांतीत ते जिथे एकत्र येतात, तेथेच शिक्षकांनी जाऊन प्रशिक्षण दिले. या मोहिमेसाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाचे १,६०० ते १,७०० प्राध्यापक, साहित्यिक आणि कार्यकर्ते कार्यरत आहेत.
दरम्यान, अनेक चालकांचे प्रशिक्षण अद्याप अपूर्ण असून व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी अधिक वेळ मिळावा, अशी मागणी रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून करण्यात आली आहे. मात्र, शासनाने चालकांना पुरेसा वेळ आणि संधी दिल्याचे सांगून मुदतवाढीची शक्यता फेटाळली आहे.या मोहिमेचा समारोप १७ ऑगस्ट रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री तथा राज्याचे भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार असून प्रशिक्षण मोहिमेत योगदान देणाऱ्या संस्था आणि स्वयंसेवकांचा सत्कार केला जाणार आहे. त्यानंतर १८ ऑगस्टपासून विशेष पथके कार्यान्वित करून मराठीचे मूलभूत ज्ञान नसलेल्या चालकांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आता मुदतवाढ नाही, थेट कारवाई
रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी पुरेशी संधी आणि वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे १५ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. ज्या चालकांना मराठीचे मूलभूत ज्ञान नसेल, त्यांच्यावर विशेष पथकांमार्फत नियमानुसार कारवाई करण्यात येईल. – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
‘आभाळच फाटलंय, तर आपण एक तरी टाका मारूया’, या भूमिकेतून ही सुरुवात केली. राज्यात १ जूनपासून सुरू झालेल्या या उपक्रमाला सुरुवातीला अल्प प्रतिसाद होता. मात्र, जनजागृती वाढल्यानंतर चालक स्वतःहून उत्साहाने मराठी शिकू लागले. सध्या राज्यभरातील १४० हून अधिक केंद्रांवर वर्ग सुरू असून चालकांची मोठी उपस्थिती आहे. अमराठी चालकांमध्ये मराठी शिकण्याची एक वेगळीच तळमळ आणि आनंद पाहायला मिळत आहे. चालकांची कोणतीही कठीण लिखित परीक्षा न घेता ‘तोंडी परीक्षा’
घेतली जात आहे. कठीण लिखित परीक्षेऐवजी तोंडी परीक्षा घेतली जात आहे. ती उत्तीर्ण झालेल्या चालकांना प्रमाणपत्र दिले जाईल, जे परवाना, परमिट किंवा बॅज नूतनीकरणासाठी उपयुक्त ठरेल. – प्रदीप ढवळ, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तथा कार्याध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद
