मुंबई : राज्यात अॅप आधारित वाहने, बाइक टॅक्सी यांची नियमबाह्य वाहतूक सुरू आहे. परंतु, या वाहतूक सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना आर्थिक फायदा करून देण्याकरिता रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा डाव परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आखला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकांचे कुटुंब उद्धवस्त होईल. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा. या मागणीसाठी राज्यातील रिक्षा-टॅक्सीचालकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन २८ एप्रिलपर्यंत परिवहन मंत्री यांना देण्यात येणार आहे. यानंतरही निर्णय मागे न घेतल्यास ४ मे पासून दररोज शहरी व ग्रामीण भागांमध्ये प्रमुख ठिकाणी ऑटोरिक्षा टॅक्सी चालक आंदोलन करणार आहे.
परवानाधारक रिक्षा व टॅक्सीचालकांसाठी १ मे पासून मराठी भाषा अनिवार्य करण्यात येणार आहे. मराठी लिहिता व वाचता न येणाऱ्या तसेच मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी घेतला आहे. हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने मुंबई मराठी पत्रकार संघात सोमवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
राज्यात बेकायदेशीररित्या परिवहन मंत्रालयाच्या कृपेने बाइक टॅक्सी सुरू आहे. या सेवेवर जाणीवपूर्वक कारवाई केली जात नाही. हा निर्णय वाहतूक सेवा पुरविणाऱ्या कंपन्या आणि खासगी उद्योगपतींना आर्थिक फायदा करून देण्याकरिता घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो ऑटोरिक्षा – टॅक्सी चालकांची उपजिवीका नष्ट होऊन त्यांची कुटुंबे उद्धवस्त होतील, अशी भीती ऑटोरिक्षा चालक – मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र अध्यक्ष शशांक राव यांनी व्यक्त केली.
राज्यात १५ लाख रिक्षा आहेत. म्हणजेच १५ लाख कुटुंबियांचा उदरनिर्वाह आहे. परवाने देताना नियम पाळून परवाने मिळाले आहेत. १५ वर्षांचा अधिवासाचा दाखला ज्यांच्याकडे आहे, त्यांना परवाने मिळतात. त्यामुळे आता परवाना रद्द करण्याचा प्रश्न येत नाही. अॅप आधारित वाहनांवर, बाइक टॅक्सीवर कोणतेही बंधन नाही. जादा भाडे आकारणी, विद्युतऐवजी पेट्रोलच्या बाइक वापरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अॅप आधारित वाहनांवर कारवाई होत नाही. परंतु, भाषेच्या नावावर रिक्षा-टॅक्सी चालकांची उपजीविका हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. रिक्षा टॅक्सीचालक स्वतः चे भांडवल लावून आणि कर्ज घेऊन रिक्षा टॅक्सी विकत घेतात. राज्यातील नागरिकांना वाहतूक सेवा पुरवितात. भाषेमुळे कधीही त्यांच्या सेवेत कमतरता आली नाही. – शशांक राव, अध्यक्ष, ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र.
