मुंबई: सीएनजी दरात सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे टॅक्सी, रिक्षा चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. ही वाढ परवडणारी नसल्याने टॅक्सी, रिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी परिवहन विभागाकडे केली आहे. खटुआ समितीनुसार भाडेवाढीची चाचपणी परिवहन विभागाने सुरु केली आहे. किमान दोन ते तीन रुपयांनी रिक्षाचे भाडे वाढवण्याचा विचार सुरु असून टॅक्सी भाडेदर अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र टॅक्सी संघटनांनी किमान पाच रुपये भाडेवाढीची मागणी केली आहे. लवकरच होणाऱ्या मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय होणार आहे.

सीएनजीचा दर २५ ऑगस्ट२०२१ ला प्रति किलोग्रॅम ५१ रुपये ९८ पैसे होता. दिवसेंदिवस या दरात वाढच होत आहे. हाच दर सध्या ७२ रुपये झाला आहे. सातत्याने सीएनजी दरात होणाऱ्या वाढीमुळे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने टॅक्सी भाडे वाढवण्याची मागणी परिवहन विभागाकडे केली आहे. सध्या सीएनजीच्या दरात ३५ टक्क्यांपेक्षाही अधिक वाढ झाली असून त्यामुळे परिवहन विभागाने टॅक्सी दरात किमान पाच रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे. मार्च २०२१ ला टॅक्सीचे भाडे २२ रुपये झाले होते. तर मुंबईतील काही रिक्षा संघटनांनीही परिवहन विभागाकडे भाडेवाढीची मागणी केली आहे.

मुंबई रिक्षामेन्स युनियनसह अन्य काही संघटनांनी केलेल्या मागणीत इंधन दरवाढ झाल्याने चालकांना एका किलोमीटर मागे १.३१ रुपये अतिरिक्त खर्च येत असल्याचे सांगितले. त्यामुळे खटुआ समितीनुसार किमान दोन ते तीन रुपयांची भाडेवाढीची मागणी केल्याचे रिक्षामेन्स युनियनचे सरचिटणीस तंबी कुरियन यांनी सांगितले.

रिक्षा भाडय़ात दोन ते तीन रुपये वाढ?

रिक्षाचे सध्याचे किमान भाडे २१ रुपये आहे. मुंबई महानगरातील काही आरटीओंनी यावर कामही सुरु केले असून त्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयालाही दिली आहे. किमान दोन ते तीन रुपये भाडेवाढ करण्याचा विचार असल्याचे सूत्रांनी सांगितले. टॅक्सी भाडेवाढीवर अद्याप काम सुरु असल्याचे सांगण्यात आले. टॅक्सीचे सध्याचे भाडे २५ रुपये असून किमान पाच रुपये वाढ मिळाल्यास सध्याचे किमान भाडे ३० रुपयांपर्यंत होईल.

रिक्षा, टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली आहे. खटुआ समितीनुसार याची चाचपणी सुरु असून यासंदर्भात प्रत्येक आरटीओकडूनही माहिती मागवण्यात आली आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत यावर निर्णय होईल. काही रिक्षा संघटना जरी भाडेवाढ नको, असे म्हणत असल्या तरीही खटुआ समितीच्या नियमात बसत असल्यास ती वाढ द्यावीच लागेल.

अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त

खटुआ समितीचे सूत्र

रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीसाठी इंधनाचे वाढत जाणारे दर व त्यामागे येणारा चालकांना खर्च. वाहनाचा देखभाल दुरुस्ती खर्च, नवीन रिक्षा, टॅक्सीची किंमत, वार्षिक विमा, मोटर वाहन कर इत्यादी मुद्दे लक्षात घेऊन भाडेसूत्रानुसार दर निश्चित केले जातात.मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी मात्र चालकांना भाडेवाढ नको. त्यामुळे प्रवासी दुरावले जाऊ शकतात, अशी भिती व्यक्त केली.