मुंबई : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. येत्या काही वर्षात देशातील पहिल्या बुलेट ट्रेन सुरू होईल. मात्र, राज्यातील पावसाचा जोर पाहता, पावसाळ्यात बुलेट ट्रेनच्या वेगावर मर्यादा येणार आहेत. तसेच अतिवृष्टीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बुलेट ट्रेनला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. यासाठी पावसाची अद्ययावत माहिती घेण्यासाठी, बुलेट ट्रेनची सेवा सुरक्षितपणे चालवण्यासाठी स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा बसवण्यात आली आहे.

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) मुंबई – अहमदाबाद दरम्यान ५०८ किमी लांबीच्या बुलेटचे काम हाती घेतले आहे. या मार्गात अनेक बोगदे, नदीवरील पूल, भुयारी मार्ग आहेत. गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनच्या टप्प्यात पावसाचे प्रमाण अधिक आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाच्या नोंदी घेण्यासाठी बुलेट ट्रेनच्या स्थानकांत पर्जन्यमापक बसविण्यात येणार आहेत. जोरदार पाऊस, अतिवृष्टीमुळे संभाव्य धोके लक्षात घेऊन बुलेट ट्रेनचा आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी पर्जन्यमापक बसवण्यात आले आहेत. तसेच पाण्याच्या पातळीच्या डेटाचे रिअल टाइम आधारावर निरीक्षण केले जाऊन, त्यानुसार प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जाईल. पर्जन्यमापकाद्वारे एका तासात पडलेला पाऊस आणि २४ तासांचा पाऊस यांच्या नोंदी ठेवल्या जातील. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमधील संवेदनशीन भूभाग, पर्वतीय क्षेत्र, बोगद्याचे प्रवेशद्वार या ठिकाणी सहा पर्जन्यमापक बसविण्याचा प्रस्ताव आले. तसेच येत्या काळात यात वाढ करण्यात येईल, अशी माहिती एनएचएसआरसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा >>>माथाडी युनियनचा पदाधिकारी असल्याचे भासवून खंडणीची मागणी; एकाला अटक

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वाऱ्याच्या गतीची निरीक्षण यंत्रणा

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या राज्यातील ५ ठिकाणी आणि गुजरातमध्ये ९ ठिकाणी अत्याधुनिक वाऱ्याच्या गतीची निरीक्षण यंत्रणा (विंड स्पीड मॉनिटरिंग सिस्टम) उभी केली आहे. या यंत्रणेद्वारे वाऱ्याची गती तपासून बुलेट ट्रेनचा वेग कमी – जास्त केला जाईल. जर वाऱ्याचा वेग ७२ किमी प्रतितास ते १२६ किमी प्रतितासदरम्यान असेल, तर त्यानुसार बुलेट ट्रेनचा वेग समायोजित केला जाईल. तसेच वाऱ्याची गती १२६ किमी प्रतितासाहून अधिक झाल्यास धोकादायक स्थिती समजून, खबरदारीचा उपाय म्हणून बुलेट ट्रेन ज्या ठिकाणी असेल, त्या ठिकाणी थांबवण्यात येईल.