मुंबई : पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले  यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने( सीबीआय) गुरुवारी अटक केली. येस बँक-डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली.  गैरव्यवहारातील रक्कम इतरत्र वळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हे प्रकरण २०१८ मधील असून, त्यावर्षी एप्रिल ते जून या कालावधीत हजारो कोटी रुपये इतरत्र व्यवहारात आणण्यात आले. त्यासाठी विविध बँक खात्यांचा वापर करण्यात आला होता. त्यातील काही रक्कम अविनाश भोसले (पान ४ वर) (पान १ वरून)  यांनी इतरत्र वळवल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी सीबीआयने १ मे रोजी पुणे आणि मुंबईत शोध मोहीमही राबवली होती.

 येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएलमध्ये तीन हजार ७०० कोटी रुपये कर्ज स्वरूपात दिले होते. यात राणा यांना ६०० कोटी रुपयांची मिळाल्याचा आरोप आहे. त्यानंतर डीएचएफएलने भोसले यांच्याशी संबंधित कंपनीत पैसे वळते केले होते. त्याच्यासोबत बांधकाम व्यावसायिक सुनील छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुपकडेही हे पेसै गेल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले होते. सीबीआयने केलेल्या तपासणीत गैरव्यवहारातील रक्कम इतरत्र वळती करण्यात भोसले यांचा प्राथमिकदृष्टय़ा सहभाग आढळल्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अविनाश भोसले पुण्यातील प्रसिद्ध व्यवसायिक आहेत. सुरूवातीच्या काळात रिक्षा चालक म्हणून काम करणारे भोसले पुण्यातील मोठे बांधकाम व्यवसायिक झाले. अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.