मुंबई : अनेकजण सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कसून काम करीत असतात. समाजाला त्यांच्या श्रमाची जाणीव व्हावी, स्वच्छतेसंदर्भात प्रभावीपणे जागरूकता निर्माण व्हावी या संकल्पनेतून ‘अवकारीका’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी गाण्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा नारा देत सर्वसामान्य नागरिकांना सजग करण्याचा प्रयत्न केला आहे.
दमदार आवाजाने लाखो रसिकांच्या हृदयांवर राज्य करणारे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी आजवर अनेक सुपरहिट गाण्यांसाठी आपला आवाज दिला आहे. दमदार आवाज आणि अर्थपूर्ण गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गायक कैलाश खेर यांची गाणी आपसूकच गुणगुणायला भाग पाडतात. आता ‘अवकारीका’ चित्रपटाच्या माध्यमातून कैलाश खेर यांच्या सूरांनी सजलेल्या गाण्यातून स्वच्छतेचा नारा रुपेरी पडद्यावरही घुमणार आहे.
या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येकाला सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे. रेडबड मोशन पिक्चर या बॅनरअंतर्गत येत्या १ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘अवकारीका’ या मराठी चित्रपटातील प्रसिद्धी गीत गायक कैलास खेर यांनी गायले आहे. अरविंद भोसले यांनी लिहिलेल्या या गाण्याला श्रेयस देशपांडे यांनी संगीतबद्ध केले आहे.
‘स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत आहे. अनेकांना मात्र त्याची जाणीवही नसते. या गाण्याच्या माध्यमातून ती जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे माझ्यासाठी हा अतिशय वेगळा अनुभव आहे’, अशी भावना कैलाश खेर यांनी व्यक्त केली. तर स्वच्छतेसारखा एक महत्त्वाचा सामजिक प्रश्न ‘अवकारीका’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडता येईल व लोकांपर्यंत पोहोचवता येईल, असे दिग्दर्शक अरविंद भोसले यांनी सांगितले.
या चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकर, अरुण जाधव यांनी केली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, गीता सिंग यांची आहे. तर अभिनेता विराट मडके चित्रपटात स्वच्छता दूताच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत या चित्रपटात राहुल फलटणकर, रोहित पवार, विनोद खुरंगळे, पिया कोसुंबकर, नितीन लोंढे, प्रफुल्ल कांबळे, स्नेहा बालपांडे, तसेच बालकलाकार वैभवी कुटे, उन्नती माने, कार्तिकी बट्टे आदी कलाकार मंडळी दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा-पटकथा, संवाद, गीते अरविंद भोसले यांची आहेत. छायांकन करण तांदळे, तर संकलन अथर्व मुळे यांचे आहे. सहदिग्दर्शक रेहमान पठाण, तर कार्यकारी निर्माता चेतन परदेशी आहेत. श्रेयस देशपांडे यांचे संगीत असून गायक कैलास खैर, सुनिधी चौहान, ज्ञानेश्वर मेश्राम यांचे स्वर चित्रपटातील विविध गीतांना लाभले आहेत.
गाण्याचे नेमके बोल काय ?
हे मानव, हे मानव
आदते अब बदल दो
कुदरत के बवंडर का
इशारा अब समझ लो