मुंबई :  पावसाळय़ाच्या काळात सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेऊन कोणत्याही परिस्थितीत आपत्तींमध्ये जीवितहानी होणार नाही याची काळजी घ्यावी. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबतचा आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी प्रशासनास दिले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असून येत्या पाच दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे , उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. आपत्तीमध्ये समन्वय अतिशय महत्त्वाचा आहे. अतिवृष्टी किंवा आपत्तीच्या काळात कोणत्याही परिस्थितीत संपर्क आणि संवादाचा अभाव राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्हाधिकारी व पालिका कार्यालयांमधील ‘वॉर रुम’  सज्ज ठेवून लोकांच्या तक्रारी तातडीने दूर कराव्यात. गेल्या वर्षी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या.  विशेषत: नेहमी दरड कोसळणाऱ्या जागांव्यतिरिक्त नव्या ठिकाणी या दरडी कोसळल्या. त्यामुळे यंदा देखील अधिक दक्ष राहण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना मोठय़ा पावसाच्या वेळेस तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये हलवून त्या ठिकाणी त्यांची सर्व व्यवस्था करण्याची जबाबदारी पालिकांनी घ्यावी. मी आणि उपमुख्यमंत्री २४ तास सर्वासाठी उपलब्ध असून गतीमानतेने शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविल्या पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांवर कारवाई..

 पावसाळा सुरू झाला की धोकादायक असलेल्या इमारती कोसळतात. त्यामुळे प्रत्येक प्रभागात अशा धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना समजतील अशा भाषेत नोटीस पाठवून या इमारती खाली केल्या पाहिजेत. जे प्रभाग अधिकारी ही कार्यवाही करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या. गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता आपत्तींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नव्याने दरडी कोसळणाऱ्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avoid harm disaster cm orders state agencies ysh
First published on: 02-07-2022 at 01:17 IST