मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्यभर समतेचा जागर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. राज्यात ६ एप्रिल ते १६ एप्रिल असे दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला दोन लाख रुपये याप्रमाणे ७२ लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांत पहिल्या दिवशी सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन करून या अभिनव कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

 उद्यापासून सामाजिक न्याय विभागाची सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व, निबंध व लघुनाटय़ स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजनांबाबत जनजागृती मेळावे किंवा तत्सम उपक्रम राबवणे, रक्तदान शिबिरे, समता दूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात लघुनाटय़, पथनाटय़ आदी माध्यमांतून सामाजिक न्यायाच्या योजनांबाबत प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ११ एप्रिल रोजी महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यनिमित्त महात्मा फुले यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येईल, तर १३ एप्रिलला संविधान जागर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. १६ एप्रिलला ग्रामीण व शहरी भागांतील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे तसेच सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे लाभ मिळालेल्या व्यक्तींचे मनोगत जाणून घेणे आदी उपक्रम राबवून या समता कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल. असे  मुंडे यांनी सांगितले.