scorecardresearch

वामन केंद्रे यांना ‘राष्ट्रीय कालिदास सन्मान’ प्रदान

हा पुरस्कार प्रा. केंद्रे यांना त्यांच्या भारतीय रंगभूमीवरील योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला आहे.

मुंबई : मध्य प्रदेश शासनाच्या वतीने दिला जाणारा देशपातळीवरील सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘राष्ट्रीय कालिदास सन्मान’ २०२० या वर्षांसाठी प्रा. वामन केंद्रे यांना रविवारी भोपाळ येथील भारत भवनामध्ये प्रदान करण्यात आला. मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांच्या हस्ते व प्रधान सांस्कृतिक सचिव शिव शेखर शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.

हा पुरस्कार प्रा. केंद्रे यांना त्यांच्या भारतीय रंगभूमीवरील योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला आहे. प्रा. केंद्रे यांनी भारतीय रंगभूमीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आठवे ‘थिएटर ऑलिम्पिक’ भारतात पार पडले होते. भारतीय नाटकांस देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे. आदिवासी, लोकनाटय़, हौशी, व्यावसायिक, शास्त्रीय नाटकांसाठी काम करतानाच वंचित कलावंतांना योग्य मंच मिळवून देण्यासाठीही त्यांनी उपक्रम राबवले आहेत.

 आपल्या अनन्यसाधारण दिग्दर्शन शैलीमुळे आणि पथदर्शी नाटय़निर्मितीमुळे त्यांना भारतीय रंगभूमीवर मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक नाटकांनी भारतीय रंगभूमीवर इतिहास घडवला आहे.  ‘झुलवा’, ‘एक झुंज वाऱ्याशी’, ‘दुसरा सामना’, ‘नातीगोती’, ‘तीन पैशांचा तमाशा’, ‘राहिले दूर घर माझे’, ‘गधे की बारात’, ‘सैंय्या भए कोतवाल’, ‘टेम्ट मी नॉट’, ‘लडी नजरिया’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘रणांगण’, ‘ती फुलराणी’, ‘प्रेमपत्र’, ‘मध्यम व्यायोग’, ‘वेधपश्य’, ‘मोहे पिया’, ‘मोहनदास’, ‘गजब तेरी अदा’, ‘लागी लगन’, ‘काळा वजीर पांढरा राजा’ ही त्यांची अत्यंत गाजलेली नाटके आहेत.

मुंबई विद्यापीठाची अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, रंगपीठ थिएटर, एनसीपीए व इतर देशी-विदेशी संस्थांबरोबर प्रा. केंद्रे यांनी केलेल्या शैक्षणिक उपक्रमांमुळे आघाडीचे अभिनेते, अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक, निर्माते, अभ्यासक, संशोधक आणि शिक्षक नाटय़क्षेत्राला मिळाले आहेत. ‘राष्ट्रीय कालिदास सन्मान’ हा त्यांना मिळालेला पाचवा राष्ट्रीय सन्मान आहे. यापूर्वी त्यांना २००४ साली ‘मनोहर सिंग स्मृती पुरस्कार’, २०१२ साली ‘केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार’, २०१७ साली ‘ब. व. कारंत स्मृती पुरस्कार’, २०१९ साली ‘पद्मश्री’ हे सन्मान प्राप्त झाले आहेत.

 यापूर्वी कालिदास सन्मान मिळवणाऱ्यांमध्ये शंभू मित्रा, इब्राहिम अल्काजी, हबीब तनवीर, बादल सरकार, ब. व. कारंत, पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, श्रीराम लागू, गिरीश कर्नाड, कावालम नारायण पण्णीकर, जोहरा सहगल, बाबासाहेब पुरंदरे, विजया मेहता, सत्यदेव दुबे, तापस सेन, रतन थियाम, बंशी कोल, अनुपम खेर, इत्यादी दिग्गज कलावंतांचा समावेश आहे. दोन लाख रुपये, मानपत्र. शाल, श्रीफळ आणि मंच सन्मान असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Awarding national kalidas sanman to vaman kendra akp

ताज्या बातम्या