मुंबई : आयुष अभ्यासक्रमाच्या चौथ्या मुक्त फेरीची निवड यादी गुरूवारी जाहीर करण्यात आली. मात्र या चौथ्या फेरीसाठी आयुष अभ्यासक्रमांतर्गत असलेल्या आयुर्वेद (बीएएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस) आणि युनानी (बीयूएमएस) या अभ्यासक्रमांच्या फक्त १३५ जागा रिक्त आहेत. अहिल्यानगरमधील सिल्लोड तालुक्यामध्ये नॅशनल आयुर्वेदिक महाविद्यालयाला मान्यता मिळाली आहे.
यामुळे या महाविद्यालयाच्या ६० जागांचा समावेशही चौथ्या फेरीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे चौथ्या फेरीसाठी आयुर्वेदिकसाठी (बीएएमएस) सर्वाधिक जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे चौथ्या मुक्त फेरीसाठी विद्यार्थ्यांमध्ये अधिक चुरस असणार आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, आयुष अभ्यासक्रमाच्या १७ हजार ९६९ जागांपैकी आतापर्यंत १७ हजार ८९४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे फक्त ७५ जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या ६४ जागा, बीएएमएसच्या ९, बीयूएमएसच्या २ जागा रिक्त राहिल्या आहेत. बीएएमएस अभ्यासक्रमाच्या १३ हजार १६ जागांपैकी १३ हजार ७ जागांवर प्रवेश झाले आहेत. तर बीएचएमएसच्या ४ हजार ४४३ जागांपैकी ४ हजार ३७९ जागा आणि बीयूएमएसच्या ५१० जागांपैकी ५०८ जागांवर प्रवेश झाले आहेत. त्यामुळे रिक्त असलेल्या ७५ जागांसाठी सीईटी कक्षाने बुधवारी चौथी मुक्त फेरी जाहीर केली. या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना २० डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचे आहेत.
दरम्यान, अहिल्यानगरमधील सिल्लोड तालुक्यात नॅशनल आयुर्वेद महाविद्यालयाला आयुष मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या महाविद्यालयाच्या ६० जागा वाढल्या आहेत. या ६० जागांचा चौथ्या फेरीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आयुर्वेद अभ्यासक्रमाच्या जागा ६९ झाल्या आहेत. त्यामुळे चौथ्या मुक्त फेरीमध्ये अधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी अपेक्षित असली तरी या फेरीमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस असणार आहे.
रिक्त जागांचा महाविद्यालयनिहाय तपशील
बीएएमएस अभ्यासक्रमाच्या नॅशनल महाविद्यालयातील ६० जागांबरोबरच लातूरमधील माऊली महाविद्यालयात चार, परभणीचे धरती महाविद्यालय आणि बुलढाण्यातील राजश्री महाविद्यालयातमध्ये प्रत्येकी दोन जागा आणि चंद्रपूरच्या विमला महाविद्यालयात १ जागा रिक्त आहे. बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या वाशिमच्या एसएचएमसीमध्ये १२, रत्नागिरीतील दापोली महाविद्यालयात ९, अहिल्यानगरच्या शरदचंद्र पवार महाविद्यालयात ८, धुळ्याच्या केडीएमजीमध्ये ५, पुण्याच्या एलएफपीईएफएसमध्ये ४, कोल्हापूरच्या जेजेएममध्ये आणि हौसाबाई महाविद्यालय, सोलापूरच्या साई महाविद्यालय, गोंदियाच्या जीएचएमसी, हिंगोलीच्या एसएसव्हीपीमध्ये प्रत्येकी ३, जळगावच्या चामुंडामाता महाविद्यालय व लातूरच्या माऊलीमध्ये प्रत्येकी १, जालनाच्या ओएचएमसीमध्ये २ आणि वाहेदमध्ये ४ जागा रिक्त आहेत. तसेच नाशिकच्या एपीजे अब्दुल कलाम महाविद्यालयात दोन जागा रिक्त आहेत.
