मुंबई : आयुषअंतर्गत असलेल्या आयुर्वेद (बीएएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस) व युनानी (बीयुएमएस) या तीन अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या जागावाटपाची तिसरी यादी जाहीर झाली. या तिसऱ्या यादीत तिन्ही अभ्यासक्रमासाठी ५,९६१ विद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीत प्रवेशाची संधीमिळाली. तर ६७३ जागा रिक्त राहिल्या आहेत. रिक्त जागा मुक्त फेरीसाठी उपलब्ध करण्यात येणार असून मुक्त फेरीचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. आयुष अभ्यासक्रमाच्या राज्यातील २०४ महाविद्यालयातील १३, ७५० जागांपैकी ७,११६ जागांवर दोन फेऱ्यांमध्ये प्रवेश झाले आहेत.

आतापर्यंत राज्यातील बीएएमएस अभ्यासक्रमाच्या १३९ महाविद्यालयांपैकी ९,३०३ जागांपैकी ५,०४१ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे तिसऱ्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या जागांवर ४,०८५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. त्यात सहा शासकीय महाविद्यालयांत ३२९ विद्यार्थी, शासकीय अनुदानित किंवा महापालिकेच्या १७ महाविद्यालयांत ८६० व विनानुदानित ११६ महाविद्यालयांत २,८९६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची मिळाली संधी आहे. तर १७७ जागा रिक्त आहेत. बीएचएमएस या अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या यादीत राज्यात ५७ वैद्यकीय महाविद्यालयांत १,६८३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली.

त्यात २ शासकीय महाविद्यालयांत ८२ व विनानुदानित ५५ महाविद्यालयांत १६०१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची मिळाली संधी मिळाली. तर ४८९ जागा रिक्त राहिल्या. बीएचएमएसच्या ४,०१९ जागांपैकी दोन फेऱ्यांमध्ये १,८४७ विद्यार्थ्यांना प्रवेश घेतले. बीयूएमएस अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीत ८ वैद्यकीय महाविद्यालयांत १९३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली. यामध्ये शासकीय अनुदानित किंवा महापालिकेच्या ३ महाविद्यालयांत २७ व विनानुदानित ५ महाविद्यालयांत १६६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली. बीयूएमएसच्या प्रवेशाच्या दोन फेऱ्यानंतर ४२८ जागांपैकी २२८ जागांवर प्रवेश झाले असून, ७ जागा रिक्त राहिल्या आहेत.

ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले, त्या विद्यार्थ्यांनी ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत आवश्यक ती मूळ कागदपत्रे व आवश्यक शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह (धनाकर्ष) वाटप झालेल्या महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) स्पष्ट करण्यात आले.