मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी) आयुष अभ्यासक्रमांच्या पहिल्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आयुर्वेद (बीएएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस), युनानी (बीयुएमएस) व इतर वैद्यकीय बीपीटीच, बीओटीच, बीएएसएलपी, बीपी अँड ओ व बीएनवायएस या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. त्यानुसार पहिली गुणवत्ता यादी २७ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमाची (एमबीबीएस) प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता सीईटी कक्षाने बीएएमएस, बीएचएमएस व युनानी या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना १८ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करायची आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांना शुल्क भरणे, संकेतस्थळावर सर्व मूळ आवश्यक कागदपत्रांची रंगीत स्कॅन केलेली प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. १५ ते १९ सप्टेंबर या कालावधीत छाननी केंद्राद्वारे दस्तऐवजांची पडताळणी करण्यात येणार आहे. २० सप्टेंबर रोजी नोंदणीकृत उमेदवारांच्या यादीची प्रसिद्धी करण्यात येणर असून २४ सप्टेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ११.५९ पर्यंत ऑनलाईन पसंतीक्रम भरता येणार आहे. तसेच २७ सप्टेंबर रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल.

नीट २०२६ या प्रवेश परीक्षेत पात्र विद्यार्थी केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणीस पात्र ठरणार आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांनी वैद्यकीय मंडळाने दिलेले दिव्यांग पात्रता प्रमाणपत्र सादर करावे. तसेच इडब्ल्यूएसचा दावा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी वैध असलेले इडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आरक्षण प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र जे आवश्यक आहे ते सादर करणे आवश्यक आहे.