मुंबई : आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे नागरिकांवर मोफत उपचार होत असल्याने अल्पावधीतच ही योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचली. आता या योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आरोग्य विभागाने समाजमाध्यमांवरून त्याची प्रसिद्धी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या योजनेतील लाभार्थींचे मनोगत ‘रील्स’च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत या ‘रील्स’ तयार करण्यात येत आहेत.

आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा वर्धापनदिन २३ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सदर योजनेचा लाभ घेतलेल्या नागरिकांचे अनुभव, उपचारादरम्यान आलेले अनुभव व योजनेमुळे मिळालेला लाभ यांची माहिती प्रभावीपणे ‘रील्स’च्या माध्यमातून अधिकृत समाज माध्यमांवर प्रसारित करण्याचा निर्णय राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने घेतला आहे. या ‘रील्स’ तयार करण्याची जबाबदारी राज्य आरोग्य हमी सोसायटीवर सोपविण्यात आली आहे.

त्यानुसार सोसायटीमार्फत प्रत्येक जिल्ह्यातून आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेतलेल्या पात्र लाभार्थ्यांची निवड करून, त्यांचे अनुभव आणि यशोगाथांवर आधारित चित्रफित तयार करण्यात येत आहे. ही चित्रफित राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयार करण्यात आली आहे. लाभार्थ्यांचा अनुभव अधिक परिणामकारकपणे मांडण्यावर या चित्रफितीमध्ये भर देण्यात आला आहे. त्यामुळे केवळ योजनेची माहिती देण्याऐवजी प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या अनुभवातून योजनेचा लाभ आणि त्याचा परिणाम अधोरेखित केला जाणार आहे.

‘रील्स’ तयार करताना आवाजाची गुणवत्ता आणि चित्रफितींची स्पष्टता उत्तम असणे आवश्यक आहे. समाजमाध्यमांवर या चित्रफिती प्रसारित होणार असल्याने त्यांची तांत्रिक गुणवत्ता चांगली ठेवण्यावर भर दिला आहे. चित्रीकरण करण्यापूर्वी संबंधित लाभार्थ्याची मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषेतील संमतीपत्राद्वारे लेखी संमती घेण्यात येत आहे. तयार करण्यात आलेल्या रील्सचे जिल्हानिहाय संकलन करून त्यांची प्राथमिक पडताळणी करण्याची जबाबदारी क्षेत्रीय व्यवस्थापकांवर सोपविण्यात आली आहे.

आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेपुरते हे अभियान मर्यादित राहणार नसून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांच्या रील्स तयार करून सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही योजनांचा लाभ घेतलेल्या नागरिकांच्या प्रत्यक्ष अनुभवांना समाज माध्यमातून प्रसिद्धी मिळणार आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या या उपक्रमामुळे आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांचा लाभ घेतलेल्या नागरिकांच्या अनुभवांना व्यासपीठ मिळणार आहे.