मुंबई : अभिनेता आयुष्मान खुराना यांना छायाचित्राधारित समाजमाध्यमावरून धमकीचे संदेश पाठवून पैशांची मागणी आणि दोन दिवस आधी अभिनेता तुषार याच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणीसाठी धमकीचे संदेश पाठवणाऱ्या एकाच आरोपीला मुंबई गुन्हे शाखेने बंगळुरूमधून अटक केली. वैभव मिश्रा (३०) असे या आरोपीचे नाव असून, तो आयआयटी पदवीधर आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंता आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचे भासवून त्याने अनेक कलाकारांना धमकावल्याचा संशय आहे.

अभिनेता तुषार कपूर याला काही दिवसांपूर्वी दूरध्वनीवरून धमकी देण्यात आली होती. या संदेशात धमकी देणाऱ्याने स्वतःचे नाव लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित हॅरी बॉक्सर असल्याचे सांगितले. तसेच पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. दरम्यान, अभिनेता आयुष्मान खुराना यालाही छायाचित्राधारित समाजमाध्यमावरून धमकीचे संदेश पाठवून पैशांची मागणी करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच तुषार कपूर आणि आयुष्मान खुराना या दोघांनाही धमकावणारी व्यक्ती एकच असल्याचे उघड झाले. मुंबई गुन्हे शाखेने तांत्रिक माहिती आणि आरोपीच्या समाजमाध्यमांवरील खात्याचा मागोवा घेत बंगळुरूमधून वैभव मिश्रा याला ताब्यात घेतले. ही कारवाई ३ नोव्हेंबर रोजी करण्यात आली.

आरोपीने अन्य काही बॉलीवूड कलाकारांनाही अशाच प्रकारचे धमकीचे ध्वनिसंदेश पाठवल्याचा संशय आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव वापरून कलाकारांमध्ये भीती निर्माण करणे आणि त्याचा फायदा घेऊन पैसे उकळणे, हा त्यामागील उद्देश असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. धमकीचे संदेश तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने वेगळा आवाज काढण्याचा प्रयत्न केला होता का, याचाही तपास केला जात आहे.

बंगळुरूमधील न्यायालयाकडून पारगमन कोठडी मिळाल्यानंतर आरोपीला मुंबईत आणून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. आरोपीने आणखी कोणत्या कलाकारांना लक्ष्य केले, धमक्यांमागे त्याचा नेमका उद्देश काय होता आणि या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.