मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या बी. आर्किटेक्चर या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस २८ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमास आजपर्यंत ६ हजार १६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
बी. आर्किटेक्चर या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाची नोंदणी १४ जुलैपासून सुरू झाली होती. विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी २४ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत ६ हजार १६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी २८ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संकेतस्थळावर अर्जाची ऑनलाइन नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी २८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना २९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्जाची पडताळणी व निश्चिती करता येणार आहे. ३१ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. १ ते ३ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना तक्रारी सादर करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर ५ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी करण्याचे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.
बी. आर्किटेक्चर प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करताना कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत. तसेच कागदपत्रांची ‘ई-पडताळणी’ किंवा ‘प्रत्यक्ष पडताळणी’ या पद्धती सुरू केल्या आहेत. ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्याने कागदपत्रांच्या पडताळणीसाठी यापैकी कोणत्याही एका पद्धतीची निवड करावी. ”ई-स्क्रूटिनी” पद्धत निवडल्यास, अर्जाची पडताळणी आणि पुष्टीकरण संबंधित ”ई-स्क्रूटिनी केंद्रा”द्वारे ऑनलाइन पद्धतीने केले जाईल; त्यामुळे उमेदवाराला यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही.
