मुंबई : राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० नुसार भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेने (पीसीआय) बॅचलर ऑफ फार्मसी (बी.फार्म) अभ्यासक्रम तंत्रज्ञानस्नेही करण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीआयने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार या अभ्यासक्रमामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा ॲनालिटिक्स, डिजिटल तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि संशोधन याचा समावेश केला आहे. हे नवीन बदल शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून देशातील सर्व संस्थांमध्ये लागू होणार आहे.
बदलत्या आरोग्य व्यवस्थेच्या गरजा, औषध उद्योगातील तांत्रिक प्रगती, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर आणि जागतिक आरोग्य क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे औषधनिर्मितीशास्त्राचा अभ्यास आता केवळ औषधांपुरता मर्यादित राहणार नसून, विद्यार्थ्यांना भविष्यातील औषध उद्योग, रुग्णालये, संशोधन संस्था आणि नियामक यंत्रणांमध्ये काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये मिळावीत, यादृष्टीने त्यात बदल करण्यात आले आहेत. प्रथम वर्षापासूनच फार्मास्युटिकल सायन्ससाठी पायथन प्रोग्रामिंग, हेल्थकेअर सायकोलॉजी आणि कम्युनिकेशन स्किल्स, डेटा ॲनालिटिक्स, बायोस्टॅटिस्टिक्स, मशीन लर्निंग यासारख्या आधुनिक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या सत्रात मशिन लर्निंगची ओळख करून दिली जाणार असून, पाचव्या सत्रात ‘इनोव्हेशन अँड स्टार्टअप इकोसिस्टम’ हा स्वतंत्र विषय, सहाव्या सत्रात फार्मास्युटिकल सायन्समधील एआयचे उपयोग आणि सातव्या सत्रात क्लिनिकल ॲप्लिकेशन्समधील एआय शिकविले जाणार असल्याचे पीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिक मिळावे, यासाठी प्रत्यक्ष उद्योग आणि रुग्णालयांमध्ये कामावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी अभ्यासक्रमात आंतरवासिता करण्याची अट कायम ठेवण्यात आली आहे. औषध उद्योग, रुग्णालय किंवा वैद्यकीय संशोधन संस्थेत किमान १२० तासांचे प्रशिक्षण तसेच अंतिम वर्षात संशोधन प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
विषय निवडीची व्याप्ती वाढवली
अभ्यासक्रमात निवड विषयांची व्याप्तीही मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना संवाध कौशल्ये, मानसिक आरोग्य व तणाव व्यवस्थापन, संगणक संचालन, योग आणि जीवन विज्ञान, पोषण, वैज्ञानिक लेखन, हरित रसायनशास्त्र, रक्त-सतर्कता, औषधांच्या दुकानाचे व्यवस्थापन, औषधी वनस्पतींची शेती, संगणक-सहाय्यित औषध निर्मिती-आराखडा, विश्लेषणात्मक पद्धतींचे प्रमाणीकरण, पूर्व-नैदानिक अभ्यास, व्यावसायिक कौशल्ये, आधुनिक उत्पादन पद्धती, वैद्यकीय उपकरणे, बायोसिमिलर्स, लसी, फार्मास्युटिकल ऑटोमेशन असे विविध विषय विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात आले आहेत.
चार वर्षांचा आठ सत्रांचा अभ्याक्रम
बी.फार्मचा चार वर्षांचा अभ्यासक्रम आठ सत्रांचा असेल. पदवीसाठी किमान १९३ क्रेडिट्स आवश्यक असतील. प्रवेशासाठी बारावीमध्ये इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा जीवशास्त्र हे विषय आवश्यक असतील. प्रत्येक विषयात किमान ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक राहणार आहे. प्रत्येक सत्रात किमान ९० शैक्षणिक कार्यदिवस असतील. शिक्षण व परीक्षा यांचे माध्यम इंग्रजी असेल. डिप्लोमा इन फार्मसी (डी.फार्म) पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी लेटरल एन्ट्रीची सुविधाही कायम ठेवण्यात आली आहे. त्यांना अतिरिक्त पूरक विषयांसह सहा सत्रांत अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे.
