मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी अमोल गायकवाड याला जामीन देण्यास विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. हल्लेखोरांना आश्रय देण्याची त्याची भूमिका पुराव्यांवरून सकृतदर्शनी स्पष्टपणे सिद्ध होते, असे निरीक्षण न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळतांना प्रामुख्याने नमूद केले.

सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ च्या रात्री वांद्रे (पूर्व) येथील त्यांचा मुलगा झीशान याच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) स्थापन विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण आर. नवंदर यांनी गायकवाड याचा जामीन फेटाळला. गायकवाड हा संघटित गुन्हेगारी टोळीच्या कारवायांमध्ये सामील होता आणि त्यानंतर हल्लेखोरांना आश्रय देण्यात त्याचा सहभाग हा त्याला या घृणास्पद गुन्ह्यासाठी रचलेल्या कटाशी जोडतो, असे सकृतदर्शनी निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. गायकवाड याची भूमिका टोळीतील इतर आरोपींच्या भूमिकेपेक्षा कमी महत्त्वाची असल्याचे म्हणता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

तत्पूर्वी, निर्दोष असून या प्रकरणात आपल्याला खोट्या आरोपांखाली गोवण्यात आले आहे, असा दावा करून गायकवाड याने जामिनाची मागणी केली होती. तपास अधिकाऱ्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ४७ आणि ४८ च्या अनिवार्य तरतुदींचे पालन केले नाही, त्यामुळे ही अटक सदोष ठरते, असा दावा देखील गायकवाड याच्यातर्फे करण्यात आला होता. याव्यतिरिक्त, गायकवाड यांचा कबुलीजबाब धमक्या आणि दबावाखाली घेण्यात आल्याने तो बेकायदा असल्याचेही त्याच्या वकिलांनी युक्तिवादाच्या वेळी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, पोलिसांनी आणि सिद्दीकी कुटुंबीयांनी गायकवाड यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. तसेच. सिद्दिकी यांच्या हत्येसाठी रचलेल्या कटात अर्जदाराने एक विशिष्ट भूमिका बजावली होती, असा दावा केला. गुन्हा घडल्यानंतर गोळीबार करणाऱ्यांना आश्रय देण्याची विशिष्ट भूमिका गायकवाड याच्यावर सोपवण्यात आल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.

भूमिका सिद्ध होत असल्यानेच जामीन नाही

आरोपांचे स्वरूप विचारात घेतल्यानंतर, गायकवाड याचा कटात आणि संघटित गुन्हेगारी टोळीला मदत करण्यात सहभाग असल्याचे दर्शवणारे पुरेसे पुरावे असल्याचे सकृतदर्शनी मत न्यायालयाने नोंदवले. त्याचप्रमाणे, गायकवाड याच्यावरील आरोप हे सहआरोपी आकाशदीप कारज सिंग यांच्यावरील आरोपांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. त्यामुळे, सिंग याला जामीन मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर गायकवाड याला जामीन मंजूर करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. सिंग याचा गुन्ह्यातील सहभाग संशयास्पद वाटल्याने उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. गायकवाड याच्याबाबत असे नाही. पुराव्यांतून त्याची गुन्ह्यातील भूमिका स्पष्ट दिसून येते. त्यामुळे, त्याला जामीन देता येणार नाही, असे नमूद करून विशेष न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला.