मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात दिल्लीस्थित तिहार तुरुंगात बंदिस्त असलेला कुख्यात गुंड अनमोल बिश्णोई याचा ताबा घेण्यात अपयशी ठरल्यावरून विशेष न्यायालयाने शुक्रवारी मुंबई पोलिसांना फैलावर घेतले. तसेच. हत्येसारख्या गंभीर खटल्यात पोलिसांना त्यांची कर्तव्ये काय आहेत याची न्यायालयाने आठवण करून देणे अपेक्षित नाही, असे सुनावून अनमोलला हजर करण्यासाठी सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्याचे बजावले.

या प्रकरणी अनमोलचा ताबा घेण्याची मागणी करणाऱ्या सिद्दीकी यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या अर्जावरील सुनावणीच्या वेळी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) स्थापन विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी मुंबई पोलिसांवर उपरोक्त ताशेरे ओढले. त्याचवेळी, २४ जुलैपर्यंत आपल्या आदेशाच्या काटेकोर अंमलबजावणीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

आरोपीचा ताबा मिळवणे, तपास करणे, आरोपीची चौकशी करणे आणि खटला चालवणे ही तपास यंत्रणा आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या प्राधिकरणांची विशेष जबाबदारी आहे. तथापि, फरारी आरोपीला हजर करण्यासाठी न्यायालयाला आदेश द्यावे लागणे ही खरोखरच दुर्दैवी परिस्थिती आहे, अशा शब्दांत विशेष न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले. तपास यंत्रणेने मात्र लेखी उत्तर सादर करून जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याच्या आरोपाचे खंडन केले. तसेच, कायद्याने परवानगी दिल्यास बिश्णोई याचा प्रत्यक्ष ताबा घेण्यास तयार असल्याचे न्यायालयाला सांगितले. परंतु काही व्यावहारिक अडचणी येत असल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला.

न्यायालयाने मात्र सक्षम न्यायालयाच्या परवानगीने या प्रकरणात आरोपीला औपचारिकपणे अटक केली जाऊ शकते. तसेच, दिल्लीतील संबंधित न्यायालयाची योग्य परवानगी घेऊन, आरोपी न्यायालयीन कोठडीत असतानाही त्याची चौकशी केली जाऊ शकते, असे सूचित केले. मात्र, दुर्दैवाने तपास यंत्रणेने आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या या कायदेशीर पर्यायांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते, असे ताशेरे न्यायालयाने ओढले. तसेच, बिश्णोई याची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेंतर्गत विहित केलेल्या प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले.

प्रकरण काय ?

सिद्दीकी (६६) यांची १२ ऑक्टोबर २०२४ च्या रात्री वांद्रे पूर्व येथील त्यांचा मुलगा झिशान याच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. तुरुंगात असलेला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्णोई याचा धाकटा भाऊ अनमोल याला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले होते. त्यानंतर, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्याला अटक केली होती. सध्या तो नवी दिल्लीतील तिहार तुरुंगात बंदिस्त आहे. बिश्णोई याचा ताबा घेण्यासाठी पोलिसांना आदेश द्यावेत या मागणीसाठी सिद्दीकी कुटुंबीयांनी गेल्या आठवड्यात न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, बाह्य दबावामुळे पोलीस त्याचा ताबा घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला होता.