मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या चेतन पारधी याला जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. पारधी याच्याविरुद्ध गुन्ह्यात सहभागी असल्याचे सकृतदर्शनी पुरावे आहेत, असे निरीक्षण नोंदवून न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्या एकलपीठाने पारधी याची जामिनाची मागणी फेटाळली. पारधी याच्यावर सिद्दीकी यांची हत्या करण्याचा कट रचणाऱ्या संघटित टोळीचा सदस्य असल्याचा आरोप आहे.

पारधी याचे नाव सह-आरोपीच्या जबाबात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तसेच, कोणाची तरी हत्या करण्याच्या कटाची माहिती त्याला होती, असे दर्शवणारा जबाबही उपलब्ध आहे. त्यामुळे, सिद्दीकी यांच्या पत्नीने या प्रकरणी हस्तक्षेप याचिका करून उपस्थित केलेला मुद्दा सयुक्तिक वाटतो, असे न्यायालयाने पारधी याची याचिका फेटाळताना नमूद केले.

आपल्याला आणि अन्य काहींना भेटलेली व्यक्ती कोणाची तरी हत्या करण्याच्या उद्देशाने घटनास्थळी आली होती हे याचिकाकर्त्याला कळाल्यानंतर त्याने त्या व्यक्तीपासून स्वतःला दूर करायला हवे होते, तथापि, तसे करण्याऐवजी याचिकाकर्ता सह-आरोपींच्या संपर्कात होता, असे शेहझीन सिद्दीकी यांच्यातर्फे सुनावणीच्या वेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

न्यायालयानेही त्याची दखल घेतली. तसेच आरोपीची भूमिका दर्शवणारे पुरावे सकृतदर्शनी नोंदीवर उपलब्ध आहेत. ””कॉल डेटा नोंदीही (सीडीआर) याचिकाविरुद्धची दोषारोप सिद्ध करणारी परिस्थिती मानली जाऊ शकते, असे न्यायमूर्ती जोशी यांच्या एकलपीठाने पारधी याला दिलासा नाकारताना स्पष्ट केले.

प्रकरण काय ?

मुलगा झिशान यांच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालयाबाहेर सिद्दीकी यांच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सिद्दीकी यांची हत्या करण्याचा कट कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्णोई याच्या टोळीने रचला असल्याचा आरोप आहे.