Baba Siddique Murder Investigation Latest Update : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत १७ जणांना अटक केली आहे. अशातच सिद्दिकी यांच्या मारेकऱ्यांविषयीची नवी माहिती समोर आली आहे. पोलीस सध्या सिद्दिकी यांच्या मारेकऱ्यांची चौकशी करत आहेत. या चौकशीत मारेकऱ्यांनी हत्येचा कट कसा रचला, कट कसा यशस्वी केला, गोळीबारानंतर कसे फरार झाले याविषयीची माहिती दिली आहे. तसेच मुख्य मारेकरी शिव कुमार गौतम उर्फ शिवाने नवी माहिती दिली आहे. त्याचा कबुलीजबाब ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आहे. शिवाने सांगितलं की बाबा सिद्दिकींवर गोळीबार केल्यानंतर तो व त्याचे साथीदार लीलावती रुग्णालयात गेले होते. बाबा सिद्दिकींचा मृत्यू झाला आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो, असं शिवाने सांगितलं.

गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत आरोपी शिव कुमार गौतमने सांगितलं की १२ ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दिकींवर गोळीबार केल्यानंतर तो तिथून पळून गेला नाही. बाबा सिद्दिकींना त्यांच्या कार्यकर्त्यांनी लीलावती रुग्णालयात नेलं होतं. त्यामुळे शिवा देखील लीलावती रुग्णालयात गेला. गोळीबारात सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे की नाही याची शहानिशा करून घेण्यासाठी तो तिथे गेला होता. शिवा तब्बल अर्धात तास रुग्णालयात व रुग्णालयाच्या आवारात फिरत होता. बाबा सिद्दिकींची प्रकृती नाजूक असल्याची माहिती त्याला मिळाली. सिद्दिकी बचावण्याची शक्यता फारच कमी असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवा तिथून बाहेर पडला आणि फरार झाला.

हे ही वाचा >> “त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, पण…”, चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

दंगल उसळलेल्या जिल्ह्यात २५ दिवस शोधमोहिम, आरोपीला नेपाळ सीमेजवळ बेड्या

लीलावती रुग्णालयात बाबा सिद्दिकींच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यानंतर शिवा तिथून पसार झाला. काही वेळात त्याने मुंबईतून पलायन केलं. त्याला व त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. मात्र, शिवा फरार होण्यात यशस्वी झाला. शिवा व त्याच्या साधीदारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आदेश देण्यात आले की शिवकुमारला घेऊनच या. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळी, उपनिरीक्षक स्वप्नील काळे, हवालदार विकास चव्हाण व हवालदार मंगेश सावंत यांनी बाहराइचमधून शिवकुमारला अटक केली व मुंबईला घेऊन आले. गेल्या कित्येक दिवसांपासून बाहराइचमध्ये जातीय हिंसाचार चालू आहे. या गंभीर परिस्थितीतही मुंबई पोलिसांमधील हे चार जवान तब्बल २५ दिवस बाहराइचमध्ये राहीले. अनेक दिवस त्याचा माग काढून त्याला पकडून मुंबईला घेऊन आले आहेत.

Story img Loader