सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेला (बार्टी) गेल्या अडीच महिन्यांपासून पूर्णवेळ महासंचालकच नाही. त्यामुळे या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अनेक कारणांनी गेल्या काही वर्षांपासून बार्टी संस्थेचा कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या संस्थेचे महासंचालक परिहार ३१ जानेवारी २०१६ रोजी निवृत्त झाले. त्यानंतर मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव दिनेश िडगळे यांच्याकडे महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला; परंतु गेल्या अडीच महिन्यांपासून या पदावर पूर्णवेळ अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली नाही.

बार्टी संस्थेवर जातप्रमाणपत्रांच्या पडताळणीपासून ते अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याचे उपक्रम राबविले जातात. राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त अनेक योजना हाती घेतल्या व त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी बार्टीवर टाकण्यात आली. महिन्याभरापूर्वी केंद्रीय सेवेतील एका अधिकाऱ्याची महासंचालकपदासाठी शिफारस करण्यात आली आहे.