मुंबई: मुंबई महापालिकेतील भाजपचे माजी नगरसेवक व माजी उपमहापौर बाबूभाई भवानजी यांनी आपल्या व्यापारी, जैन समाज तसेच इतर समाजातील अनुयायांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शीव येथे कार्यक्रमात त्यांचा हा पक्षप्रवेश पार पडला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांना शिवसेनेचे धनुष्यबाण देऊन स्वागत केले.

शीव येथील मानव सेवा संघ सभागृहात सोमवारी शिवसेना (शिंदे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला खासदार व लोकसभा गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबोधित केले. या सभेचे आयोजन शिवसेनेचे सरचिटणीस, माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केले होते. या सभेत मुंबईतील शिवसेनेचे सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख आणि गटप्रमुख यांच्या उपस्थितीत बाबूभाई भवानजी यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.

या सभेच्यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात बूथ स्तरापर्यंत पक्ष मजबूत करण्यावर भर दिला. सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी राज्यभरात संघटना बळकट करण्यासाठी १५०० प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्याची घोषणा केली. पुढील तीन वर्षे निवडणुका नसल्याने महाराष्ट्रातील प्रत्येक गाव व परिसरात संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाईल, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

बाबूभाई भवानजी यांच्याबद्दल बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, ते जमिनीशी जोडलेले नेते आहेत आणि सर्वसामान्यांसाठी नेहमी उपलब्ध असतात. त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष अधिक मजबूत होईल आणि व्यापारी, व्यावसायिक, जैन, गुजराती, राजस्थानी, कच्छी समाज तसेच सर्वसामान्यांमध्ये पक्षाचा विस्तार होईल. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पक्षाला मोठा फायदा होईल, असा विश्वासही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांच्या दीर्घ अनुभवाचा पक्षाला योग्य उपयोग होईल व त्यांना मोठी जबाबदारी दिली जाईल, असेही आश्वासन यावेळी श्रीकांत शिंदे यांनी दिले.

मी महायुतीतून महायुतीतच याबाबत बाबूभाई भवानजी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी महायुतीत होतो आताही महायुतीतच आहे. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणूकीच्यावेळी मी दादरमधील प्रभाग क्रमांक १९२ साठी अर्ज भरला होता. मात्र एकनाथ शिंदे यांच्या आग्रहास्तव अर्ज मागे घेतला. तेव्हा त्यांच्याशी मैत्री झाली. त्यांनी पक्षप्रवेशाबद्दल विचारले होते. शिवसेनेत (शिंदे) जैन, व्यापारी चेहरा नसल्यामुळे आपल्याला पक्षात घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. म्हणून हा पक्षप्रवेश केल्याचे बाबूभाई भवानजी यांनी सांगितले.