मुंबई : मुलुंड येथील निर्मल लाईफ स्टाईल परिसरातील एका नाल्यातून सुमारे १.५ फूट लांबीच्या मगरीला वाचविण्यात वन विभाग आणि वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनला यश आले. स्थानिक नागरिकांनी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधल्यानंतर या मगरीला वाचविण्यात आले. सध्या मगरीला वाईल्ड वेल्फेअर असोसिएशनच्या केंद्रात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
मुलुंड येथील निर्मल लाईफ स्टाईल परिसरात बुधवारी मगर दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मगर आपल्या नैसर्गिक अधिवासात राहणे पसंत करते. मात्र, त्यांची संख्या वाढल्यास मगरी नवीन अधिवासाच्या शोधात मूळ अधिवास सोडतात. हा मगरींच्या नैसर्गिक वर्तनाचा एक भाग आहे, असे वन्यजीवांसाठी कार्य करणाऱ्या वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
निर्मल लाईफ स्टाईल परिसरात ही मगर अनेक दिवसांपासून वास्तव्यास असल्याची शक्यता वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. मात्र, प्रदूषित पाण्याच्या परिसरात वास्तव्य केल्याने मगरीला काही गंभीर आजार झाल्याची शक्यता असून त्यामुळे मगरीला सध्या वेल्फेअर असोसिएशनच्या बचाव केंद्रात पशु वैद्यकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
मगरीच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात येणार असून वैद्यकीय अहवाल प्राप्त मिळाल्यानंतर वन विभागाच्या नियमांनुसार मगरीला पुन्हा तिच्या मूळ अधिवासात सोडले जाईल, असे वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या रोहित मोहिते यांनी सांगितले.
मुंबईत मगरींचा अधिवास कुठे ?
मुंबईतील पर्यावरण हे अजूनही मगरींसाठी पोषक आहे. विशेषतः तुळशी, विहार आणि पवई तलावांमध्ये मगरी आढळतात. तुळशी तलाव संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षित क्षेत्रात असून विहार आणि पवई तलाव शहरातील मानवी वस्त्यांच्या जवळ
आहेत. काही नैसर्गिक पाण्याचे प्रवाह हे नाल्यांना जोडले गेले आहेत. पावसाळ्यासह अनेकदा इतर ऋतूंमध्येही मगरी नवीन अधिवास शोधण्यासाठी तसेच अन्नाच्या शोधात बाहेर पडतात, असेही मोहिते यांनी सांगितले. निर्मल लाईफ स्टाईल येथील नाल्यातील परिसरात आणखी काही मगरींचे वास्तव्य असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या संबंधित यंत्रणांकडून या परिसरात मगरींचा शोध घेण्यात येत आहे.
यापूर्वीही मुंबई शहरात मगरी आपला मूळ अधिवास सोडून नव्या अधिवासाच्या शोधात बाहेर पडण्याच्या काही घटना झाल्या आहेत. त्यासाठी मुंबईतील तुळशी, विहार आणि पवई तलावांमधील मगरींची अधिकृत गणना होणे गरजेचे असून एखाद्या ठिकाणी मगरींची संख्या वाढल्यास वन विभागाच्या नियमांनुसार त्यांचे इतर सुरक्षित अधिवासात स्थलांतर करणे शक्य होईल. – रोहित मोहिते, वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशन
