‘ललित’ च्या स्थापनेचा १९६४-६५ चा काळ म्हणजे अनेक दिग्गज साहित्यिकांच्या उमेदीचा काळ. माझे वडील केशवराव कोठावळे यांची शन्नांशी घनिष्ठ मैत्री होती. गिरगावातील आमचे कार्यालय असो की विलेपार्लेमधील घर असो, गप्पांचा तासनतास अड्डा रंगत असे. त्यातूनच मग ग्रंथप्रेमी मंडळाची सुरुवात झाली. मी तेव्हा एक शाळकरी मुलगा होतो आणि या गप्पा ऐकण्यात मला रस असे. गिरगावातील कुलकर्णी यांची भजी आणि चहा मागविला जाई. या मंडळात शन्नांबरोबरच जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक, उमाकांत ठोंबरे, रमेश मंत्री, वसंत सरवटे आदींचा समावेश होता. शन्ना सचिवालयात नोकरी करीत असत. तेथून सुटल्यावर ते गिरगावात येत. मग गप्पांचा फड रंगल्यावर रात्री शेवटची गाडी पकडून ते डोंबिवलीला जात आणि माझे वडील (केशवराव) पाल्र्याला घरी येत असत. या दिग्गज साहित्यिक मंडळींचा तो अतिशय उमेदीचा व बहारीचा काळ होता. प्रत्येक जण नोकरी करून लेखन करीत होता. दिवाळी अंक, पुस्तके आणि अन्य ठिकाणी लिखाण करण्याची जणू स्पर्धाच लागलेली होती. नवीन प्रयोग करण्यासाठी आणि काहीतरी वेगळे करून दाखविण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक होता. शन्नांच्या कथांमध्ये शहरी जीवनाचे चित्रण असे. पुल, वपु, शन्ना यांच्या कथावाचनाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. शन्नांना विनोद करण्याची आवड होती. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारताना वातावरण हलकेफुलके असे. दिग्गजांच्या साहित्यकृतींची पर्वणी साधण्याचा तो काळ अजूनही स्मरणात आहे.

केवळ एका अटीमुळे गिरणी कामगारांवर अपात्रतेची टांगती तलवर; म्हाडाकडून घर मिळणार की नाही…