मुंबई: ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या शरीरातील बीजांची बेकायदेशीर विक्री करण्याचे धक्कादायक रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, यात सहभागी असलेल्या डॉक्टरांना अटक केली आहे. या प्रकरणातील दोषींवर ‘मकोका’ सारख्या कडक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत दिली.
आमदार चित्रा वाघ यांनी बीज विक्री प्रकरणाबाबत लक्षवेधी सूचना मांडली. यावर उत्तर देताना योगेश कदम यांनी हे कारस्थान अत्यंत संघटित पद्धतीने करण्यात आला असल्याचे सांगितले. ठाण्यातील एका घरावर छापा टाकला असता तिथे कोणतेही अधिकृत आयव्हीएफ केंद्र नव्हते. नाशिकमधील एका नोंदणीकृत केंद्राच्या डॉक्टरांच्या माध्यमातून कारस्थान रचण्यात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, एकाच महिलेची वारंवार नोंदणी करण्यासाठी खोट्या आधारकार्डचा वापर करण्यात आला. वेगवेगळ्या नावांनी नोंदणी करून या महिलांकडून वारंवार बीजांड काढले जात होते. आतापर्यंत अशा १० पीडित महिला समोर आल्या आहेत. या रॅकेटमध्ये वापरण्यात आलेली सोनोग्राफी यंत्रणाही अनधिकृत होती, ज्यावर आता कारवाई करण्यात आली आहे. नाशिकमधील संबंधित केंद्रातून औषधांचाही गैरवापर झाला आहे. तज्ज्ञ समित्या नियमितपणे तपासणी करत असल्या तरी या विशिष्ट प्रकरणात गुन्हेगारी स्वरूपाचे कटकारस्थान असल्याने पोलीस प्रशासन सखोल तपास करीत आहे, असे कदम यांनी सांगितले.
८६० केंद्रांची होणार तपासणी
महाराष्ट्रात सुमारे ८६० आयव्हीएफ केंद्रे आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृह विभाग आणि आरोग्य विभाग संयुक्तपणे या सर्व केंद्रांची झाडाझडती घेण्यात येणार असून तिथे गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाई केली जाईल. भविष्यात अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्रांवर ‘बायोमेट्रिक पडताळणी’ सक्तीची करण्याचा विचारही सरकार करत आहे, असे कदम यांनी सांगितले.
