मुंबई : भांडूपमधील शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नगरसेविका आणि खासदार संजय दिना पाटील यांची कन्या राजोल पाटील यांनी रविवारी मातोश्री निवासस्थानी जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आपण पक्षातच आहोत व ठाकरे परिवारासोबतच आहोत अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली. ही सदिच्छा व औपचारिक भेट असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील सहा खासदार फुटल्याची चर्चा सुरू असून त्यांनी संसदेत वेगळा गट स्थापन केल्याचा दावा शिवसेना (शिंदे) पक्षाकडून केला जात आहे. या सहा खासदारांचा शिवसेना (शिंदे) गटातील पक्षप्रवेश लांबणीवर पडला असला तरी खासदारांचा गट फोडण्यासाठी योजलेले ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावाही शिवसेना (शिंदे) पक्षातील नेते करीत आहेत. तसेच आता खासदारांपाठोपाठ मुंबई महापालिकेचे नगरसेवकही फुटणार असल्याची चर्चा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांमध्ये ईशान्य मुंबईतील खासदार संजय दीना पाटील यांचाही समावेश आहे. पाटील यांच्या बंडानंतर त्यांची नगरसेविका कन्या राजोल पाटील आता काय भूमिका घेणार याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यातच राजोल पाटील यांनी रविवारी दुपारी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
राजोल पाटील आणि संजय दीना पाटील हे दोघेही वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला हजर नव्हते. तसेच पक्षश्रेष्ठींनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीलाही संजय पाटील उपस्थित नव्हते. तर राजोल पाटील यादेखील गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिका मुख्यालयात आलेल्या नाहीत.
माझ्यावर दबाव नाही
मातोश्रीहून परतताना राजोल पाटील यांनी प्रसारमाध्यमांकडे आपली भूमिका स्पष्ट केली. आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. मी पक्षासोबतच आहे. मी ही भूमिका पक्षश्रेष्ठींसमोर मांडल्याचे त्यांनी सांगितले. राजोल पाटील यांनी आपल्या प्रभागात सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती उद्धव ठाकरे यांना दिली. पक्षाने सोपविलेली जबाबदारी आपण पूर्ण क्षमतेने पार पाडत असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. प्रभागातील विकासकामांना प्राधान्य देऊन नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम सुरू आहे, असे राजोल पाटील यांनी सांगितले.
‘फादर्स डे’च्या दिवशी वडिलांच्या विरोधात भूमिका ?
आमच्या घरात प्रत्येकाला आपापले निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. मी माझा निर्णय घेतला आहे. माझे वडील त्यांचा निर्णय घेतील आणि जाहीर करतील असेही विधान राजूल पाटील यांनी केले आहे. त्यामुळे फादर्स डे च्या दिवशीच त्यांनी वडिलांच्या विरोधात भूमिका घेतल्याची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू होती. दरम्यान, उद्धव ठाकरे हे आज ईशान्य मुंबईच्या दौऱ्यावर असून भांडुप पश्चिम परिसरात त्यांचे आगमन होणार आहे. यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी आपण उपस्थित राहणार असल्याचेही राजोल पाटील यांनी सांगितले.
मनसेची जागा राजोल पाटील यांना
राजोल यांना महापालिका निवडणूकीत भांडूप येथून उमेदवारी देण्यात आली होती. मनसेच्या माजी नगरसेविका अनिषा माजगावकर या प्रभागातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. ठाकरे बंधूंची युती असतानाही माजगावकर यांना डावलून राजोल यांना संधी देण्यात आली होती.
