मुंबई : बदलापूर जांभूळाच्या संवर्धनाला आणखी गती मिळणार आहे. जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जतन, संवर्धन करण्यात येत असलेल्या बदलापूर जांभळाच्या प्रत्यक्ष शेतीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक लवकरच येणार आहे.

बदलापूर जांभळाला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाल्यानंतर जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बदलापूर जांभूळ या जातीची स्वतंत्र नोंद करण्यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानुसार केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत वनस्पती वाण आणि शेतकरी अधिकार प्राधिकरण कायद्याच्या (प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राइट्स प्रोटेक्शन ऑथॉरिटी, पीपीव्ही अॅण्ड एफआरए) अंतर्गत नोंदणी केली जाणार आहे.

या नोंदणीसाठी लखनौ येथील केन्द्रीय उपोष्णकटिबंधीय फळबाग संस्थेतील वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अंशुमान सिंह प्रत्यक्ष बदलापुरात येवून नवीन जातीचे वैशिष्टे, विविध झाडे, फळांमधील गुणधर्मांचा एक सारखेपणा, वर्षांनुवर्षे केल्या जाणाऱ्या उत्पादनात दिसून येणारी, न बदलणारी मूळ वैशिष्टांचा अभ्यास सिंह आणि त्यांची समिती करणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रोपवाटिका, बियाणे बँक, प्रक्रिया उद्योगाला सरकारी मदतीचा मार्ग मोकळा होईल, त्याद्वारे बदलापूर जाभळाच्या जतन आणि संवर्धनाला गती मिळणार आहे.

स्थानिक उत्पादकांना संरक्षण मिळणार

बदलापूर जांभूळ या स्थानिक वाणाची अधिकृत नोंदणी झाल्यानंतर या वाणाच्या संवर्धनाला तसेच त्याच्याशी संबंधित शेतकरी व स्थानिक समुदायाच्या हक्कांना कायदेशीर संरक्षण मिळणार आहे, अशी माहिती जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास चॅरिटेबल ट्रस्ट, बदलापूर (पूर्व) मुख्य विश्वस्त आदित्य गोळे यांनी दिली.

‘जांभूळ वन’ विकसित केले जाणार

बदलापूरचे जांभूळ महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर भागात उत्पादीत होणारी जांभळाची एक प्रसिद्ध आणि दर्जेदार पारंपारिक जात आहे. बदलापूरच्या जांभळांना त्यांच्या विशिष्ट आकार, चव आणि गुणवत्तेमुळे भौगोलिक मानांकन मिळाले आहे. बदलापूर परिसरात उत्पादीत होणाऱ्या ‘गरवी’ जातीचे जांभूळ सर्वोत्कृष्ट मानले जाते. मांजर्ली, वालिवली, बोराडपाडा आणि कोंडेश्वर परिसरात उत्पादन होते. भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राने देखील या जांभळांच्या दर्जाची तपासणी केली आहे. जांभूळ पिकाचे क्षेत्र वाढवण्यासाठी आणि त्याचे जतन करण्यासाठी चामटोली गावात ‘जांभूळ वन’ विकसित करण्यात येत आहे. तसेच महाबळेश्वरच्या धर्तीवर येथे ‘जांभूळ मधाची’ निर्मिती करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.