मुंबई : गोरेगावमधील पहाडी येथील म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या भूखंड क्रमांक ‘अ’वर लवकरच ९०० घरांच्या बांधकामाला सुरूवात होणार आहे. अल्प, मध्यम आणि उच्च गटासाठी ही घरे बांधण्यात येणार असून यातील काही घरे मुंबई उच्च न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी असणार आहेत. या घरांच्या बांधकामासाठी नुकतीच पर्यावरणीय मंजुरी प्राप्त झाली आहे. आता पुढील प्रक्रिया पूर्ण करून या घरांच्या बांधकामाला सुरूवात केली जाणार आहे. तर चार वर्षांमध्ये घरांचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे.
पहाडी, गोरेगाव येथील मुंबई मंडळाच्या मालकीच्या भूखंडावर दुसऱ्या व्यक्तीने मालकी हक्क दाखविल्याने सदर भूखंड न्यायालयीन वादात अडकला होता. अखेर या न्यायालयीन लढाईत मुंबई मंडळाला यश मिळाले आणि २५ वर्षांनंतर हा भूखंड मंडळाच्या ताब्यात आला. भूखंड ताब्यात आल्यानंतर २०१८ मध्ये तेथे ४ हजार ६०० घरांचे बांधकाम करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला. यातील २५०० हून अधिक घरांचे काम पूर्ण झाले आणि सोडत काढून या घरांचा ताबाही देण्यात आला. मात्र त्याचवेळी येथील भूखंड ‘अ’वरील अंदाजे ९०० घरे न्यायालयीन वादात अडकली होती. दरम्यान, न्यायालयीन कर्मचाऱ्यांना या भूखंडावर काही घरे बांधून देण्याची मागणी झाली. ही मागणी मान्य करून भूखंड ‘अ’वरील न्यायालयीन कर्मचाऱ्यांसह परवडणारी घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या घरांच्या बांधकामाला लवकरच सुरूवात होणार आहे. या प्रकल्पातील वाद आणि सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. तसेच नुकतीच या प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरीही प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता लवकरच ९०० घरांच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
उपलब्ध माहितीनुसार येथे अल्प गटासाठी १८ घरे, मध्यम गटासाठी ६९० आणि उच्च गटासाठी १९३ घरे बांधण्यात येणार आहेत. ही घरे अंदाजे ७३.५० चौरस मीटर ते ९४.५० चौरस मीटर क्षेत्रफळाची असणार आहेत. तर २९ आणि ३५ मजल्यांच्या इमारतीत ही घरे असणार आहेत. या घरांचे काम पूर्ण होण्यास चार वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. म्हाडाच्या सोडतीच्या नवीन निर्णयानुसार, घरांचे काम पूर्ण होण्यास एक-दीड वर्षांचा कालावधी असताना या निर्माणधीन घरांचा सोडतीत समावेश केला जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार २०२८-२९ च्या सोडतीत ही घरे समाविष्ट करण्यात येण्याची शक्यता आहे. मुंबईत गोरेगावमध्ये हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही बाब दिलासादायक आहे.
२० दुकानांचाही समावेश
पहाडी, गोरेगाव येथील भूखंड ‘अ’वर ९०० घरांसह २० दुकानेही बांधण्यात येणार आहेत. म्हाडाच्या गृहप्रकल्पात रहिवाशांच्या सोयीसाठी दुकानांचेही बांधकाम केले जाते. त्यानुसार येथेही २०दुकाने बांधली जाणार आहे. या दुकानांची विक्री भविष्यात ई लिलावाद्वारे केली जाणार आहे.
