मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीविरोधात लवकरच आरोपपत्र दाखल करण्याचा निर्णय विशेष तपास पथकाने घेतला असून त्यादृष्टीने आरोपीविरोधात भक्कम पुरावे सादर करण्यासाठी त्याच्या चारित्र्याविषयीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्याप्रकरणी आरोपीच्या पहिल्या पत्नीचा जबाब नोंदवण्यात आला असून आरोपी लैंगिकदृष्ट्या विकृत असल्याचे त्यात म्हटले आहे. विशेष तपास पथक आरोपी पूर्वी काम करत असलेले ठिकाण, त्याची दुसरी पत्नी व त्याच्या सोबत काम करणाऱ्यांकडून त्याच्याबाबत माहिती घेणार आहेत. दरम्यान, पोलीस व डॉक्टर यांच्यासमोर चौकशीदरम्यान आरोपीने गुन्हा केल्याचे मान्य केले.

आरोपीची तीन लग्न झाली असून सध्या तो तिसऱ्या पत्नीसोबत रहात होता. ती गर्भवती आहे. याशिवाय आरोपीची पहिली पत्नी पालघर येथील एका गावात राहते. तिची माहिती मिळवण्यात तपास पथकाला यश आले असून तिचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. आरोपी लैंगिकदृष्ट्या विकृत असल्यामुळे पाच दिवसांतच तिने त्याला सोडले व परत त्याच्या घरी गेलीच नाही. दरम्यान, आरोपीने चौकशीदरम्यान त्याच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तसेच वैद्यकीय तपासणीदरम्यानही डॉक्टरांनी लैंगिक अत्याचाराबाबत विचारलेल्या प्रश्नांमध्येही मुलींसोबत गैप्रकार केल्याचे मान्य केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या सर्व माहितीच्या आधारे आरोपीच्या चारित्र्याबाबत अहवाल तयार करण्यात येणार आहे. तो आरोपीविरोधात भक्कम पुरावा ठरू शकेल. आरोपीविरोधात मुदतीपूर्वी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोपीविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. आरोपी यापूर्वी कामाला असलेल्या गृहनिर्माण सोसायटीतही जाऊन तेथून त्याच्याबाबतची माहिती घेण्यात येणार आहे. तसेच आरोपीच्या इतर दोन पत्नींचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे. आरोपीच्या मोबाइलचा सर्फींग डेटा तपासण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा – मुंबई : गणेशोत्सवात १३ धोकादायक पुलांचे विघ्न, आगमन-विसर्जन मिरवणुकीच्या वेळी काळजी घेण्याचे आवाहन

हेही वाचा – चतुरंग प्रतिष्ठानचा २८ – २९ सप्टेंबरला सुवर्णमहोत्सव सांगता सोहळा, विविध क्षेत्रांतील ११ मान्यवरांना गौरवण्यात येणार

बदलापूरमधील शाळेत काम करणाऱ्या साफसफाई कर्मचाऱ्याने १२ आणि १३ ऑगस्ट रोजी शाळेच्या स्वच्छतागृहात चार वर्षीय दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. एका पीडित मुलीने तिच्या पालकांना ही घटना सांगितल्यानंतर हे प्रकरण उघड झाले. वैद्यकीय तपासणीत दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे १६ ऑगस्टला याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आणि १७ ऑगस्टला आरोपीला अटक करण्यात आली. गुन्हा दाखल करण्यात झालेल्या विलंबाविरुद्ध आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेच्या अपुऱ्या उपाययोजनांवर राज्यभरात तीव्र आंदोलने झाली. २० ऑगस्ट रोजी आंदोलनकर्त्यांनी शाळेची तोडफोड केली आणि बदलापूर रेल्वे स्थानकात करण्यात आलेल्या आंदोलनामुळे लोकल सेवा तब्बल आठ तास विस्कळीत झाली होती.