मुंबई : मुंबई उपनगरी रेल्वे प्रवासात हरवलेली मौल्यवान वस्तू, बॅग शोधणे अवघड होते. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तात्काळ वस्तू परत मिळत नाहीत. रेल्वे स्थानकात पडून राहिलेली बॅग पोलीस प्रशासनापर्यंत पोहचविणाऱ्या व्यक्तीही विरळाच. परंतु एका जागरुक प्रवाशामुळे रेल्वे स्थानकावर राहिलेली, पाच लाख रुपये रोख असलेली बॅग तिच्या मूळ मालकाला परत मिळाली आहे.
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकात फलाट क्रमांक ४ वर प्रवासी हेमप्रकाश पाटील यांना एक बॅग पडलेली दिसली. बॅगेची तपासणी केली असता त्यात तब्बल ५ लाख रुपये रोख रक्कम आणि मिठाईचा डबा होता. पाटील यांनी ती बॅग चर्चगेट स्थानक अधीक्षकांच्या हवाली केली. त्यानंतर बॅगेबाबत पश्चिम रेल्वे नियंत्रण कक्ष आणि आरपीफ नियंत्रकाला संदेश पाठवण्यात आला. जेणेकरून कोणी बॅग हरवल्याची तक्रार केल्यास ती तात्काळ त्यांच्या ताब्यात देता येईल. यावेळी भूपेश अग्रवाल हे बॅग हरवल्याची तक्रार करण्यासाठी आले. संपूर्ण चौकशीनंतर आणि कायदेशीर बाबी पूर्ण करून झाल्यानंतर त्यांंच्याकडे बॅग सूपूर्द करण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हेमप्रकाश पाटील यांच्या प्रशंसनीय कृतीबद्दल त्यांचे कौतुक केले आणि सर्व प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.