मुंबई : बनावट लसीकरण प्रमाणपत्र घोटाळय़ातील आरोपी माझभाई पदरवाला याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. याचिकाकर्त्यांचा या गुन्ह्याशी संबंध जोडणारा कोणताही विश्वासार्ह पुरावा नाही, असे सकृदर्शनी मत न्यायालयाने नोंदवले.

पदरवाला याच्यावर बनावट लसीकरण प्रमाणपत्रे तयार करून सहआरोपी माविया भोरानिया याला उपलब्ध केल्याचा, तर भोरानिया हा लोकांकडून पैसे गोळा करून त्यांना ही बनावट लसीकरण प्रमाणपत्रे पुरवायचा, असाही पोलिसांचा आरोप आहे. न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या सुट्टीकालीन एकलपीठाने पदरवाला याला २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. पोलिसांच्या आरोपानुसार, करोनाची लस न घेताच लसीकरणाची बनावट प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे पालिकेच्या लसीकरण मोहिमेशी संबंधित साहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. सरिता आडे यांना कळले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सहआरोपी सहाद शेख याला १५०० रुपये घेऊन बनावट लसीकरण प्रमाणपत्र देताना अटक केली. शेखच्या मोबाइलमध्ये पोलिसांना अनेक बनावट लसीकरण प्रमाणपत्रे सापडली. तपासात भोरानियाचा सहभाग उघड झाला. त्याने पदरवाला असे दाखले तयार करून देत असल्याचे सांगितले. त्यानंतर पदरवाला याला अटक करण्यात आली. मात्र बनावट लसीकरण प्रमाणपत्रे किंवा त्याच्याशी संबंधित आक्षेपार्ह सामग्री हस्तगत करण्यात आलेली नसल्याचे पदरवाला याने सांगितले.