मुंबई : देशाचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी येणाऱ्या पिढीचे आरोग्य सुदृढ असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने विदर्भातील थॅलेसेमिया व सिकल सेल या आजाराचा प्रश्न महत्वाचा आहे. या आजारांचे निर्मुलन होऊन त्या बालरुग्णांना वेळेत आवश्यक उपचार उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने प्रयत्नशील आहेत. मुख्यमंत्री यांच्या या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी बजाज फायनान्स ही संस्था स्वतः पुढकार घेवून या बाल रुग्णांच्या आरोग्यासाठी उपक्रमात सहभागी झाली आहे.
बजाज फायनान्स बाल आरोग्य व कौशल्य विकास या क्षेत्रात करत असलेले कार्य कार्यकौतुकास्पद आहे. याच धर्तीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महत्वपूर्ण उपक्रमांपैकी विदर्भातील सिकल सेल व थॅलसेमिया ग्रस्त बालकांच्या आरोग्याच्या उपक्रमासाठी बजाज फायनान्स काम करणार आहे. या अनुषंगाने नागपूरच्या डॉ. विंकी रुघवानी हे गेल्या काही वर्षांपासून सेवाभावी उपक्रम राबवत आहेत. डॉ. रुघवानी यांच्या या सेवाभावी उपक्रमाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी बजाज फायनान्सने पुढाकार घेतला आहे.
विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जाती व जमातींतील सिकल सेल व थॅलेसेमिया ग्रस्त मुलांवर डॉ. रुघवानी हे गेल्या अनेक वर्षांपासून समर्पित उपचार करत आहेत. नागपूर येथील थॅलेसेमिया आणि सिकलसेल सेंटर हे थॅलेसेमिया आणि सिकल सेल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेद्वारे चालवले जाते. या केंद्राची स्थापना २०१० साली करण्यात आली आहे. डॉ. रुघवानी यांच्या सेवाभावी उपक्रमाला देखील बजाज फायनान्समार्फत अर्थसहाय्य करण्यात येत आहे. डॉ. रुघवानी यांच्या सेवाभावी उपक्रमा अंतर्गत थॅलेसेमिया आणि सिकल सेल ग्रस्त मुलांवर नियमीतपणे उपचार करण्यात येवून गरज भासल्यास त्यांना उपचारासाठी दाखलही करण्यात येते.
थॅलेसेमियाच्या एका रुग्णावर वर्षभरात रक्तसंक्रमणासाठी साधारण २४ हजार, औषोधोपचारासाठी साधारण २५,७८३ रुपये आणि आवश्यक तपासण्यांसाठी अंदाजित आठ हजार असे एकूण ५८ ते ६० हजार इतका खर्च एका रुग्णावर होत असतो. तसेच सिकेलसेल ग्रस्त एका रुग्णासाठी वर्षभरात औषोधोपचार, केंद्रात ॲडमिशन आणि विविध तपासण्यांसाठी साधारण नऊ हजार ते १०,००० रुपये खर्च अपेक्षित असतो. विदर्भाच्या ज्या भागात या आजाराचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येतात त्या रुग्णांच्या कुटुंबियांना हा खर्च परवडणारा नसतो. अशा परिस्थितीत रुग्णांना मोफत रक्त संक्रमण (ब्लड ट्रान्सफ्यूजन) करणे व रक्त संक्रमणासाठी लागणारे डिस्पोजेबल साहित्य, रुग्णांना आवश्यक औषधे, जसे की आयर्न किलेटर्स, मोफत दिली जातात. या थॅलेसिमिया व सिकलसेल ग्रस्त रुग्णांना देण्यात येणारे उपचार व औषधी विविध हे स्वयंसेवी संस्थामार्फत निःशुल्क पुरविण्यात येत आहेत. या स्वयंसेवी संस्थांना बजाज फायनान्सच्या माध्यमातून अर्थ सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते.
गेल्या वर्षभरात थॅलेसेमियाच्या १४८ व सिकल सेलच्या १७६ रुग्णांवर डॉ. रुघवानी यांच्या केंद्रात उपचार करण्यात येत आहेत. तसेच दरवर्षी साधारण सिकल सेलग्रस्त ३०० बाल रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या सिकल सेल निर्मूलनाचे राष्ट्रीय उद्दिष्ट पूर्ण होण्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालकांच्या आरोग्य संवर्धनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमाला बजाज फायनान्सचा पाठिंबा मिळाल्यामुळे या बालकांचे जीवन सुकर होण्यास मदत होत आहे.