मुंबई : ‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर जनावरांची वाहतूक करणारी वाहने अडवणाऱ्या स्थानिकांवर कायदेशीर करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी पोलीसांना दिल्या आहेत. मुंबईतील अल्पसंख्याक समाजाचे सर्वपक्षीय आमदार, राज्य खाटीक महासंघाचे प्रतिनिधींची मंगळवारी मंत्रालयात मुख्य सचिवांबरोबर बैठक झाली.
देवनार कत्तलखान्यामध्ये कत्तलीसाठी २०० रुपये असणारे शुल्क बकरी ईदनिमित्त प्रतिपशु २० रुपये करण्यात आले आहे. मुंबईमध्ये कुर्बानीसाठी ७० ठिकाणे होती, ती १०९ करण्यात आली आहेत. नागरिक या १०९ ठिकाणांवर कुर्बानीसाठी २८ ते ३० मे या कालावधीत ‘MyBMC’ या मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे परवानगी मिळवू शकतात. काही गृहनिर्माण संस्थाना कुर्बानीसाठी यापूर्वीच परवाने दिलेले आहेत. कुर्बानीसाठी दुकानदारांनाही परवाने देण्यात आले आहेत, असे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी बैठकीनंतर सांगितले.
शेळ्या, मेंढ्याना टॅगिंग नसले तरी बकरी ईद निमित्ताने विना टँगींगची पशु खरेदी-विक्री करता येत नसे. मात्र बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विना टँगीगच्या पशुंच्या खरेदी- विक्रीस परवानगी देण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिका आणि पशुसंवर्धन विभागाला मुख्य सचिवांनी या बैठकीमध्ये दिल्या आहेत. तसेच बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर हेल्पलाईन सुरु करण्याचे बैठकीत निश्चित झाले.
जनावरांची वाहतुक करणारी वाहने प्रत्येक शहराच्या नाक्यावर काही संघटनांचे कार्यकर्ते अडवतात. यावेळी पोलीस क्षमतेपेक्षा अधिक जनावरांची वाहतूक केली म्हणून कारवाई करतात. मात्र ही कारवाई व्यापाऱ्यांवर न करता वाहन मालकांवर केली पाहिजे. मोटार वाहन परिपत्रक तसे सांगते, असा मुद्दा आमदार रईस शेख यांनी बैठकीत नमूद केला. तशा सूचना मुख्य सचिवांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.
मंत्रालयातील समिती सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख, आमदार अबू आझामी, काँग्रेसचे आमदार अस्लम शेख, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्याआमदार सना मलिक, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार झिशान सिद्दीकी तसेच ऑल महाराष्ट्र खाटीक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीला अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था ),पशुसंवर्धन व दुग्धविकास, ग्रामविकास, सहकार व पणन, नगरविकास आदी विभागांचे प्रधान सचिव प्रत्यक्ष तसेच राज्यातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त दूरदृष्टी प्रणाली द्वारे उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल होते. शांती व त्यागाचे प्रतिक असलेली बकरी ईद २८ मे रोजी आहे.
मुंबई पालिकेची सुसज्जता :
बृहन्मुंबई महापालिकेने देवनार येथील आशिया खंडातील सर्वात मोठ्या जनावर बाजारांमध्ये जनावरांच्या निवाऱ्यासाठी १ लाख १० हजार चौरस मीटर जागेची व्यवस्था केली आहे. म्हशींच्या धार्मिक कुर्बानीसाठी १० हजार चौरस मीटरचे क्षेत्र राखीव ठेवण्यात आले आहे. १५ दिवसांच्या या कालावधीत देवनार कत्तलखाना आणि परिसरातून ७ हजार ५०० मेट्रिक टन कचरा साफ होण्याचा अंदाज आहे. सुरक्षेच्या दृष्टीने देवनार परिसरात ५०० पोलीस कर्मचारी, २०० महापालिका सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबई पालिका प्रशासनाने दिली.
