‘मातोश्री’ची शिवसेना नेत्यांना तंबी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाचशे-हजाराच्या नोटांवरील बंदीचा फटका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला बसता कामा नये,  कोणत्याही परिस्थितीत पुण्यतिथीचा कार्यक्रम जोरदारच झाला पाहिजे, असा सज्जड दम ‘मातोश्री’ने दिल्यामुळे शिवसेनेचे विभागप्रमुख, खासदार, आमदार, नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत.

शिवाजी पार्कवरील ‘स्मृतिस्थळी’ येणाऱ्या शिवसैनिकांना काहीही कमी पडू नये यासाठी या सर्व नेतेमंडळींनी आपल्या अर्थदात्यांकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. काहींनी आपले वजन वापरून उधारीत कार्यक्रम पार पडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चलनशुद्धी मोहिमेमुळे रोख रकमेद्वारे व्यवहार करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाचेच धाबे दणाणले आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांचे स्वरूप बदलण्याचा घाट काही नेतेमंडळींना घातला होता. ‘लोकसत्ता-मुंबई’ने ‘बाळासाहेबांच्या स्मृती कार्यक्रमालाही चलनकल्लोळाचा फटका!’ या मथळ्याखाली १५ नोव्हेंबरच्या शिवसैनिकांमधली ही अस्वस्थता मांडली. मात्र त्यावर व्यक्त होताना ‘कार्यक्रम झालेच पाहिजेत. त्यासाठी कोणतीही सबब चालणार नाही’, असा सज्जड दम ‘मातोश्री’ने विभागप्रमुखांपासून थेट नगरसेवकांपर्यंत सर्वानाच दिल्याने सर्वाचीच धावपळ उडाली आहे.

ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवाजी पार्कमध्ये राज्यातून मोठय़ा प्रमाणावर शिवसैनिक येत असतात. या सर्व           शिवसैनिकांसाठी नाश्ता आणि जेवणाची सोय मुंबईमधील विभागप्रमुख, खासदार, आमदार, नगरसेवक आदींवर सोपविण्यात येते. शिवाजी पार्क परिसरात त्यासाठी आठ-दहा मोठे मंडप उभारले जातात. चहा, नाश्ता, जेवण, पिण्याचे पाणी आदींची तेथे व्यवस्था करण्यात येते. शिवाजी पार्क परिसरातील काही सभागृह भाडय़ाने घेतले जातात आणि तेथे महिला शिवसैनिकांची व्यवस्था केली जाते. तेथेही नाश्त्यापासून भोजनाची व्यवस्था असते. या व्यवस्थेसाठी येणारा खर्च शिवसेनेचे विभागप्रमुख, खासदार, आमदार, नगरसेवक, शिवसेनाप्रणीत कामगार संघटना, ग्राहक संरक्षण विभाग आदींमार्फत उचलला जातो. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यातिथीनिमित्त १६ आणि १७ नोव्हेंबर या दोन दिवसांसाठी ही सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र आता चलनगोंधळामुळे नाश्ता, जेवण, पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या शिवसेना पदाधिकारी पेचात पडले आहेत. बँकेतून तातडीने मोठी रक्कम मिळणे शक्य नसल्याने खर्च कसा भागवायचा या विवंचनेत ते पडले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bal thackeray death anniversary program
First published on: 16-11-2016 at 01:42 IST