दादर-शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाजवळ अखंडपणे मशाल प्रज्वलित ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २३ जानेवारी रोजी ज्योत प्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर कांस्य धातूपासून तयार केलेली तीन फूट उंच मशाल अखंडपणे तेवत ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर महापौर स्नेहल आंबेकर यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या मशालीची ज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उद्योग मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित राहणार आहेत.