मुंबई आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी लढणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दक्षिण मुंबईमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या प्रस्तावावर महापौर दालनात पार पडलेल्या गटनेत्यांच्या शुक्रवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

पालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक शुक्रवारी पालिका मुख्यालयातील महापौर दालनात आयोजित करण्यात आली होती. व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात करणाऱ्या आणि अल्पावधीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यंगचित्रकार म्हणून नावलौकीक मिळविणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी लढा उभा केला. मुंबईला स्वत:ची ओळख मिळवून देण्यासाठी जनआंदोलने केली, प्रसंगी तुरुंगवास भोगला, ‘मार्मिक’मधून राजकारण्यांवर टीकेचे आसूड ओढले.
मुंबई आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचा दक्षिण मुंबईत पूर्णाकृती पुतळा उभारावा, अशी मागणी करणारा प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी या बैठकीत मांडला. या बैठकीत त्यास मंजुरी देण्यात आली.