शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. बाळासाहेबठाकरेंचा नातू म्हटलं की समोर येतं ते आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि अमित ठाकरेंचं नाव. पण ज्या नातवाची फसवणूक झाली आहे तो आहे ऐश्वर्य ठाकरे. स्मिता ठाकरे यांचा मुलगा. ऐश्वर्य ठाकरेची एक दोन नाही तर, तब्बल सहा वेळा फसवणुकीचे व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी त्याने पोलिसात तक्रार दिली आहे.

नेमकं काय घडलं?

ऐश्वर्य ठाकरे याच्या सहा ट्रान्झॅक्शन्समधून एकूण १९ हजार १५ पैसे डेबिट झाल्याची माहिती समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सर्व सहा व्यवहार परदेशातून झाल्याच उघड झालं आहे. तर ३० ऑक्टोबर रोजी हे व्यवहार झाले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ऐश्वर्य याने याप्रकरणी ओशिवारा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता या प्रकरणी कसून चौकशी करत आहेत. फसवणुकीचा प्रकार कसा घडला आणि कोणी सर्व व्यवहार केले? याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

दहा मिनिटांत पैसे लंपास

ऐश्वर्य ठाकरेच्या बँक खात्यातून १० मिनिटांत १९ हजार ६३८ रूपये लंपास झाले. ऐश्वर्यचं एका खासगी बँकेत बचत खातं आहे. ऐश्वर्यने कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक केलं नव्हतं. तसंच अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या संदेशांना प्रतिसादही दिला नव्हता. तरीही पैसे कसे काय वजा झाले याचा शोध पोलीस घेत आहेत. ३० ऑक्टोबरला रात्री १.३० ते १.४० या दहा मिनिटांत त्याच्या खात्यातून पैसे लंपास करण्यात आले याचा शोध आम्ही घेत आहोत असं पोलिसांनी म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

ऐश्वर्य ठाकरे अंधेरी या ठिकाणी आई स्मिता ठाकरे आणि आजी कुंदा यांच्यासह राहतो. ऐश्वर्य ठाकरेने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव मस्तानी चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. तसंच निशांची या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे.

निशांची सिनेमात ऐश्वर्य ठाकरे मुख्य भूमिकेत

‘निशांची’ या सिनेमात ऐश्वर्य ठाकरे मुख्य भूमिकेत झळकला. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला. पण ओटीटीवर मात्र सिनेमा ट्रेंड होताना दिसला. बॉक्स ऑफिसवर सिनेमा सपशेल फेल ठरला. अशात ‘निशांची’ नंतर आता ‘निशांची 3’ मोठ्या पडद्यावर नाही तर, ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. दिग्दर्शक अनुराग कश्यपने चाहत्यांना सरप्राइज देत सिनेमाचा सीक्वेल थिएटरऐवजी थेट ओटीटीवर आणला आहे.