वज्रादपि कठोराणि, मृदुनि कुसुमादपि!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सांगावयाचे झाले तर ‘वज्रादपि कठोराणि, मृदुनि कुसुमादपि’ असेच म्हणावे लागेल. अनेक आंदोलने, लढाया ज्यांनी खांद्याला खांदा लावून लढल्या आणि यशस्वी केल्या केवळ ते नेतेच नव्हे तर रक्ताची नातीही कालांतराने शिवसेनाप्रमुखांना दुरावली याचे दु:ख त्यांच्या मनात नक्कीच होते,

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सांगावयाचे झाले तर ‘वज्रादपि कठोराणि, मृदुनि कुसुमादपि’ असेच म्हणावे लागेल. अनेक आंदोलने, लढाया ज्यांनी खांद्याला खांदा लावून लढल्या आणि यशस्वी केल्या केवळ ते नेतेच नव्हे तर रक्ताची नातीही कालांतराने शिवसेनाप्रमुखांना दुरावली याचे दु:ख त्यांच्या मनात नक्कीच होते, मात्र तरीही ते हतबल झाले नाहीत, त्यामुळेच त्यांना वरील उक्ती अत्यंत चपखलपणे लागू होते.
स्पष्टवक्तेपणा हा शिवसेनाप्रमुखांच्या नसानसांत भिनलेला होता त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे हे उर्मट आहेत, अशी त्यांची प्रतिमा झाली होती. या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांच्याबद्दल, ठाकरी भाषेत वक्तव्य करतात, असे बोलले जात असे. मात्र ज्यांचा असा समज होता त्यांची आणि बाळासाहेबांची प्रत्यक्ष भेट झाली की नव्यानेच भेटणाऱ्याची बाळासाहेबांबद्दलची मनातील प्रतिमा पुसली जायची. कारण उर्मटपणा त्यांच्यात कधीच नव्हता. त्यामुळेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही कार्यकर्त्यांना शिवसेनाप्रमुखांचे उदाहरण देण्यास कचरत नसत.
संघटनेत शिवसैनिक सर्वात मोठा असे सांगणारे बाळासाहेब त्याप्रमाणे वागत असत. ते नेहमी शिवसैनिकांना भेटत असत. महाराष्ट्राचे भाग्यविधाते कै.यशवंतराव चव्हाण यांनीही काँग्रेस पक्षाच्या सभेत कार्यकर्त्यांना सांगितले होते की, शिवसेनाप्रमुखांचे यश कशात आहे, तर ते सामान्य शिवसैनिकाला ओळखतात, त्याला नावाने हाक मारतात, ते शिवसैनिकांना भेटतात, त्यांना टाळत नाहीत. ही बाब काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांनी लक्षात ठेवली पाहिजे.
आपले वडील प्रबोधनकार ठाकरे यांचेही उदाहरण बाळासाहेब नेहमीच देत असत. बंगल्याबाहेर जमलेल्या चपला प्रबोधनकार बाळासाहेबांना नेहमी दाखवत असत आणि सांगत की एकवेळ पैशांची गरीबी येऊ दे, पण ही खरी श्रीमंती आहे. शिवसेनाप्रमुखांच्या उपस्थितीतच प्रबोधनकारांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन महापौर या नात्याने माझ्या हस्ते एका समारंभात करण्यात आले. माझ्या महापौरांच्या अध्यक्षतेखाली दादांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले हा माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले. माझ्यासाठीही तो आनंदाचा दिवस होता. मी महापौर झालो तेव्हा माझा सत्कार आयोजित करण्यात आला. शिवसेनाप्रमुखही त्याला उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम बाळासाहेबांना हार घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते म्हणाले की, शहराच्या प्रथम नागरिकाचा मान मोठा आहे. महापौर हा कोणत्याही पक्षाचा नाही असे नाही. तथापि, प्रथम तुम्ही शिवसैनिक आहात हे विसरू नका आणि न्याय करताना तो पक्षपाती नसावा याचे भान ठेवा, हे सांगण्यासही शिवसेनाप्रमुख विसरले नाहीत.
स्थानीय लोकाधिकार समिती आणि महासंघ यांचा जन्म हा विचारांवर आधारित होता. एअर इंडियावर आम्ही मोर्चा काढला. तो मोर्चा अविस्मरणीय होता. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना चपराक हाणली. पण केवळ चपराक हाणून प्रश्नांचा पाठपुरावा कसा होणार, त्यामुळे स्थानीय लोकाधिकारच्या ताकदीचा उपयोग करावयाचे ठरले आणि त्यातूनच प्रथम एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समिती जन्माला आली. या माध्यमातून ज्यांना नोकरी लागली त्यांना बेकारांसाठी लढण्यास पुढे आणले आणि स्थानीय लोकाधिकार समिती वाढत गेली आणि तिचा महासंघ झाला. त्यानंतर विविध आस्थापनांमध्ये स्थानीय लोकाधिकार समिती आली आणि अधिकाऱ्यांवर सतत दडपण ठेवले. त्यानंतर २५ वर्षे मी त्या महासंघाचा अध्यक्ष होतो.
बघताबघता २५ वर्षे लोटली आाणि बाळासाहेब एक दिवस म्हणाले की, सगळे जण आपापली पदे घेऊन बसले तर अन्य लोकांना पदे कशी मिळणार. माझ्यासाठी शिवसेनाप्रमुखांचा हा संकेत पुरेसा होता. महासंघाच्या २५ वर्षांच्या अधिवेशनातच मी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. एक गोष्ट नक्की की स्थानीय लोकाधिकार समितीमुळे दबाव निर्माण झाला आणि त्याखाली सर्व कामे होत गेली. बाळासाहेबांनी संघटनेत हुकुमशाही गाजविली असेही बोलले जाते. मात्र शिवसेनेच्या नेत्यांना तसा अनुभव नाही. बहुतेक सर्व निर्णय चर्चा होऊनच घेतले जात असत. ज्या प्रश्नावर एकमत होत नसे त्याबाबत बाळासाहेबांचा निर्णय अंतिम होता आणि त्यांचा तो अधिकार अबाधित होता.
महाराष्ट्रात १९९५ मध्ये प्रथम सत्तांतर झाले, त्यामध्येही बाळासाहेबांचा सिंहाचा वाटा होता. आमच्या सरकारच्या शिवसेनाप्रमुखांसमवेत जवळपास रोजच बैठका होत होत्या. परंतु शिवसेनाप्रमुखांनी मुख्यमंत्र्यांवर अथवा कोणत्याही मंत्र्यावर विशिष्ट कामासाठी कधीही दबाव आणला नाही. या सरकारचा ‘रिमोट कंट्रोल’ माझ्याच हातात आहे, असे त्यांनी म्हटले असले तरी त्या ‘रिमोट कंट्रोल’चा वापर त्यांनी कधीच केला नाही. केवळ असे चित्र निर्माण झालेले त्यांनाही हवे होते कारण त्यामुळे सरकारवर वचक राहतो, अशी त्यामागील त्यांची भूमिका होती. सत्तेत भाजप सहभागी होता, युतीचे एक शिल्पकार कै. प्रमोद महाजन हे व्यवहारी नेते होते. युती अबाधित राहणे दोघांच्याही हिताचेच आहे, ही महाजन यांची भूमिका होती त्यामुळे कोणताही वाद महाजन यांनी होऊ दिला नाही. परंतु महाजन हे अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांचे प्रतिनिधी आहेत याचे भान बाळासाहेबांनीही ठेवले आणि शिवसेनेतही महाजन यांना योग्य मान बाळासाहेबांनी दिला. कालौघात पक्षातील अनेक नेते हयात राहिले नाहीत, जे होते त्यांच्यापैकी अनेकजण शिवसेनाप्रमुखांना सोडून गेले, रक्ताच्या नात्यानेही पाठ फिरविली. पण या प्रकाराने खचतील तर ते बाळासाहेब कसले. या गोष्टींचे त्यांना दु:ख जरुर झाले, पण ते हतबल झाले नाहीत कारण अनेक नेते सोडून गेले असले तरी त्यांच्यावर नितांत प्रेम करणारा आणि त्यांना अपेक्षित असलेला कडवा शिवसैनिक त्यांच्यासमवेत अखेपर्यंत होता.    

’ सुरुवातीला बाळासाहेब दौऱ्यावर जाण्यासाठी रात्रीचा प्रवास करीत असत, मात्र ते रात्रभर झोपत नसत. सुधीरभाऊ गाडी चालविणार असतील तरच मी झोपेन, असे ते म्हणत इतका त्यांचा माझ्यावर विश्वास होता. मात्र साहेबांना थोडी तरी विश्रांतीची आवश्यकता आहे, हे ध्यानात येताच मी गाडी चालविण्यास सुरूवात करीत असे. एकदा सभेसाठी पुण्याला बाळासाहेबांना घेऊन जावयाचे होते. त्यासाठी शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी त्यांच्या गाडीतून साहेबांना पुण्याला नेले. मनोहर जोशी यांच्याकडून शिवसेनाप्रमुखांबद्दल सातत्याने ऐकत होतो आणि मीही त्यांच्याकडेआकर्षित झालो. माझाही संपर्क वाढला. त्यानंतर ठाण्याची निवडणूक आली त्यासाठी बाळासाहेबांना मी आणि मनोहर जोशी गाडीतून ठाण्याला घेऊन जात होतो. तेथेच साहेबांमुळे जाहीर सभा काय ते कळले. पुढील वर्षीच मुंबई महापालिकेची निवडणूक आली आणि साहेबांनी माझी व मनोहर जोशी यांची उमेदवारी जाहीर करून टाकली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Balasaheb thackeray strong man with soft heart

ताज्या बातम्या