मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उद्या गुरुवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या आधी माजी मंत्री बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाची तसेच, डॉ. नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजित कदम, मुजफ्फर हुसेन व यशोमती ठाकूर हे कार्याध्यपदाची सूत्रे स्वीकारतील.

लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या जोडीला पाच कार्याध्यक्षांची नेमणूक करण्यात आली. उद्या नवनियुक्त अध्यक्ष व कार्याध्यक्ष प्रभादेवी येथे जाऊन सिद्धीविनायकाचे दर्शन घेतील. त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करीत. सकाळी अकरा वाजता दादर येथील टिळक भवनात औपचारिकरीत्या पदभार स्वीकारला जाईल. त्यानंतर अशोच चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी एक वाजता शवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. बैठकीला  राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व अन्य नेते उपस्थित राहणार आहे.

हारतुरे नकोत-थोरात

मुंबईतील डोंगरीत इमारत कोसळून मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुखात मी सहभागी आहे. उद्या मी काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा पदभार स्वीकारणार आहे. या वेळी सत्कार, हारतुरे स्वीकारण्याची माझी इच्छा नाही. कार्यकर्त्यांनी हारतुरे, पुष्पगुच्छ आणू नयेत, अशी विनंती बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.