मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे पक्षात बदलाचे वारे वाहू लागले आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान मध्य प्रदेशातील रायपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर राज्यस्तरावर मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद उघड झाल्यानंतर, राज्यातील काही नेते दिल्लीत गेले असून, पक्षश्रेष्ठींकडून काय भूमिका घेतली जाऊ शकते, याचा कानोसा घेतला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने चांगले यश मिळविले; परंतु नाशिकमधील डॉ. सुधीर तांबे व सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे बाळासाहेब थोरात दुखावले होते, अशी पक्षात चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व थोरात यांच्यात आधीपासूनच सुप्त संघर्ष सुरू होता, नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून जो घोळ झाला, त्यानंतर हा वाद उघड झाला. पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पक्षातही खळबळ उडाली आहे.

पक्षातून मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब थोरात राजीनामा मागे घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यामुळे दिल्लीस्तरावरही त्यांच्या राजीनाम्याची गंभीर दखल घेतली गेली आहे. मात्र कुणालाही नाराज न करता हा पेच सोडवण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे समजते. थोरात यांच्यासारख्या राज्यातील महत्त्वाच्या नेत्याने राजीनामा दिला आणि त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही, असा संदेश जाऊ नये, यासाठी राज्यस्तरावर बदल करण्याचा विचार पुढे आल्याचे कळते.

रायपूरला राष्ट्रीय अधिवेशन

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे येत्या २४, २५ व २६ फेब्रुवारी असे तीन दिवस रायपूर येथे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. त्यात मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीवर शिक्कामोर्तब केले जाईल. त्याचबरोबर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय स्तरावर पक्षातही फेरबदल केले जाणार आहेत. त्याच वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होतील, असे सांगितले जाते. या सर्व पक्षांतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही नेते दिल्लीला गेले आहेत. पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याचा कानोसा घेण्यासाठी दिल्लीत आलो असल्याचे एका नेत्याने सांगितले. राज्यस्तरावर बदल होतील, असे वातावरण असल्याचेही त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thorat resignation congress leaders in delhi possibility national convention ysh
First published on: 09-02-2023 at 00:02 IST