लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई : पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या ‘ईद मिलाद उन-नबी’निमित्त राज्यात अनेक ठिकाणी मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर डीजे आणि प्रखर दिव्यांचा (लेझर बीम) वापर करण्यात येत असून त्यावर बंदी घालण्याची मागणी पुण्यातील काही ज्येष्ठ मुस्लिम बांधवांनी उच्च न्यायालयात केली आहे. इस्लाममध्ये पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवस ईद मिलाद उन-नब म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने घरे आणि धार्मिक ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात येते, तसेच मिरवणुका काढल्या जातात. मात्र, मागील काही वर्षांपासून या मिरवणुकांमध्ये डीजे आणि प्रखर दिव्यांचा सर्रास वापर करण्यात येतो. या मिरवणुकीत मुस्लिम तरूण डीजेच्या ठेक्यावर बेधुंद होऊन नाचताना दिसतात. तसेच, काही ठिकाणी मिरवणुकीत मद्य आणि अमलीपदार्थंचाही वापर होत असल्याचा संशय यांचिकाकर्त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे, हा सगळा प्रकार मुस्लिम धर्माची शिकवण, तत्वे आणि विचारांच्या विरोधात असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. आपला ईद साजरी करण्यास आणि मिरवणूक काढण्यास विरोध नाही. परंतु, ती साजरी करण्याच्या पद्धतीवर आक्षेप असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. आणखी वाचा-मुंबई : आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू पुण्यासह मुंबईतील भेंडी बाजार परिसरातही अशाच प्रकारे डीजे आणि प्रखर दिव्यांचा वापर केला जातो. डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होऊन अनेकांना श्रवणाच्या व ह्रद्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. तर, प्रखर दिव्यांच्या वापरामुळे अनेकांनी दृष्टी गमावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर येत्या १६ आणि १७ सप्टेंबर रोजी ‘ईद मिलाद उन-नबी’च्या दिवशी डीजे आणि लेझरच्या वापरावर बंदी आणावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. वकील ओवेस पेचकर यांच्यामार्फत करण्यात आलेली ही जनहित याचिका गुरूवारी सादर केली जाण्याची शक्यता आहे. आणखी वाचा-मुंबई : भ्रष्टाचार केल्याप्रकरणी तीन परिवहन निरीक्षकांविरोधात गुन्हा दरम्यान, सण-उत्सवांत मोठ्या प्रमाणात होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन करण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरल्याचे पुरावे याचिकाकर्त्यांना सादर करता आले नाहीत. त्यामुळे, आदेशांच्या उल्लंघनाप्रकरणी चौकशीचे आदेश देता येणार नाही, असे नमूद करून सण-उत्सवांतील डीजे, प्रखर दिव्यांचा वापर, विक्री या सगळ्यांवर बंदी घालण्यास न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच नकार दिला होता. तसेच, ती जनहित याचिका निकाली काढली होती.