scorecardresearch

बॅण्ड स्टॅण्ड परिसरात रविवारी ‘फॉर्म्युला वन कार’ धावणार, दिग्गज रेसर ‘डेव्हिड कौल्थर्ड’ ‘फॉर्म्युला वन कार’ चालवणार

तरुणाईच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि प्रचंड लोकप्रिय असलेल्या ‘फॉर्म्युला वन कार’चा वेगवान थरार तब्बल १४ वर्षांनंतर मुंबईत पाहायला मिळणार आहे.

formula one car race in band stand
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुंबई : तरुणाईच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि प्रचंड लोकप्रिय असलेल्या ‘फॉर्म्युला वन कार’चा वेगवान थरार तब्बल १४ वर्षांनंतर मुंबईत पाहायला मिळणार आहे. ‘रेड बुल इंडिया’ आणि ‘ओरॅकल रेड बुल रेसिंग’ यांच्या वतीने रविवार, १२ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून वांद्रयातील बॅण्ड स्टॅण्ड परिसरात ‘रेड बुल शोरन’चे आयोजन करण्यात आले आहे.

फॉर्म्युला वन ग्रॅण्ड प्रिक्स तब्बल १३ वेळा जिंकणारा दिग्गज रेसर डेव्हिड कौल्थर्ड ‘फॉर्म्युला वन कार’ चालवून आपले कौशल्य मुंबईकरांना दाखविणार आहे. यापूर्वी २००९ ला डेव्हिड कौल्थर्ड ‘शोरन’साठी मुंबईत आला होता आणि तेव्हा मुंबईकरांनी वांद्रे – वरळी सागरी सेतूवर ‘फॉर्म्युला वन कार’चा वेगवान थरार अनुभवला होता.  ‘रेड बुल शोरन’च्या पार्श्वभूमीवर मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डेव्हिड कौल्थर्ड म्हणाला की, ‘अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबईत ‘फॉर्म्युला वन कार’ चालविण्यासाठी मी उत्सुक आहे.

हेही वाचा >>> मुंबई : कथांच्या माध्यमातून प्राणी व वृक्ष जगताची सफर; राणीच्या बागेत ‘कथाकथन महोत्सव’

भारतात ‘फॉर्म्युला वन कार’च्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे मला खात्री आहे की, मी जेव्हा बॅण्ड स्टॅण्डच्या रस्त्यांवर कार चालवेन, तेव्हा मला मोठी गर्दी पाहायला मिळेल’. ‘फॉर्म्युला वन कार’ तयार करणे ही एक अभियांत्रिकी कला आहे. शोरनदरम्यान कारचा वेग आणि आवाज उपस्थितांमध्ये आपसूकच उत्साह निर्माण करतो. ही कार चालविण्यासाठी शारीरिक व मानसिकरित्या तयारी करावी लागते आणि जेव्हा मी ‘फॉर्म्युला वन कार’ चालवितो, तेव्हा एक चालक म्हणून माझ्याही अंगावर रोमांच उभे राहते, असेही डेव्हिड म्हणाला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2023 at 20:01 IST