मुंबई : वांद्रे गरीब नगरमधील अपात्र झोपडपट्टीधारकांना पात्रता सिद्ध करण्याकरिता पुन्हा संधी दिली जाईल, असे आश्वासन राज्य सरकारने मंगळवारी विधान परिषदेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार झीशान सिद्दिकी यांनी गरीब नगरमधील झोपु धारकांवरील कारवाईचा प्रश्न लक्षवेधी सूचनेमार्फत उपस्थित करत येथील झोपु धारकांना घरे मिळावी, अशी मागणी केली.
येथील किमान ५०० घरे तोडण्यात आली. त्यातील १०० पात्र झोपडीधारकांचे कुर्ला येथे पुनर्वसन केले जाणार आहे. नवीन घर किती क्षेत्रफळाचे असेल, पावसाळ्यातच येथील रहिवाशींची घरे तोडण्यात आल्याने त्यांना नुकसानभरपाई देणार का, याचा मानवी दृष्टीकोनातून विचार करण्याची मागणी सिद्दिकी यांनी केली. तसेच, तोड कारवाईपूर्वी येथील झोपड्यांचे रितसर सर्वेक्षण करण्यात आले होते का, त्यांना नोटीस दिली गेली होती का, अशी विचारणा त्यांनी केली.
नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच या झोपड्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. तसेच, कारवाईपूर्वी स्पार्क या संस्थेतर्फे सर्वेक्षण करण्यात आले होते. यावेळी १४१ झोपडपट्ट्यांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यातील २०११ पूर्वीचे १०० झोपडीधारक पात्र ठरले. या १०० झोपड्या सोडून उर्वरित ५०० अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांना अजुनही वीज- पाणी देत आहोत. अधिकृत झोपडीधारकांना १५ ऑगस्टपर्यंत कुर्ल्यात ३०० चौरस फुटांचे घर दिले जाईल, अशी माहिती मिसाळ यांनी दिली.
या उत्तरानंतर झीशान यांनी अन्य अपात्र झोपडीधारकांना पात्रता सिद्ध करण्याची संधी देणार का, असा प्रश्न केला. त्यावर इतरांनाही अशी संधी दिली जाईल, असे आश्वासन मिसाळ यांनी दिले.
