मुंबई : कनिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांना मोठ्या चौरस फुटांच्या सदनिका आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांना कमी चौरस फुटांच्या सदनिकांचे वाटप झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी मुख्य सचिवांची भेट घेऊन संबंधित प्रकार निदर्शानास आणून दिल्यानंतर त्यांनी सदोष सदनिका वाटप रद्द करून नियमानुसार फेरवाटप करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.
कनिष्ठांना मोठी, वरिष्ठांना लहान घरे
वांद्रे (पूर्व) येथील इमारत क्रमांक १३ आणि १४ मधील सदनिकांचे वाटप शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे. त्यात सहसचिव, उपसचिव आणि तत्सम दर्जाच्या अधिकाऱ्यांना ५३८ फुटांच्या सदनिकांचे वाटप केले आहे. तर त्यांच्यापेक्षा निम्न, कनिष्ठ वेतन श्रेणीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ८२९ चौरस फुटांच्या सदनिकांचे वाटप करण्यात आले आहे. वरिष्ठांना दोन बीएचके आणि कनिष्ठांना तीन बीएचके सदनिका, असा प्रकार झाला आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी हा प्रकार मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यांनी तत्काळ सामान्य प्रशासन विभागाच्या विशेष चौकशी अधिकाऱ्यांना हे सदोष सदनिका वितरण रद्द करून नियमांनुसार फेरवितरण करण्याचे आदेश दिले आहेत.
फेरवाटपाचे मुख्य सचिवांचे आदेश
मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना नियमानुसार सदनिकांचे वाटप झालेले नाही. त्यामुळे सदोष सदनिका वाटप रद्द करून, नियमांनुसार फेरवाटप करावे, अशी मागणी राज्याचे मुख्य सचिव राजेश आग्रवाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, अशी माहिती मंत्रालय मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे यांनी दिली आहे.
