मुंबई : मागील अनेक दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. यामुळे सातत्याने शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत नोंदला जात आहे. रविवारीही शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक १३५ म्हणजेच ‘मध्यम’ श्रेणीत नोंदला गेला. तर वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात शहरातील सर्वात प्रदूषित हवेची नोंद झाली.
मागील दोन ते तीन महिन्यांपासून मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ झाली आहे. शहरातील आणि उपनगरातील अनेक भागातील हवा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली जात आहे. यामुळे मुंबईकरांना प्रदूषित हवेचा सामना करावा लागत आहे. शहरात धुरकट वातावरणही कायम असून यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. नैसर्गिक कारणांसह अनेक मानवनिर्मित कारणांमुळेही हवा प्रदूषणात वाढ होत आहे.
समीर ॲपच्या नोंदीनुसार, रविवारी शहरातील आणि उपनगरातील बहुतांश भागात हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली. तर वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात शहरातील सर्वात प्रदूषित हवेची नोंद झाली. येथे सकाळपासूनच हवेचा दर्जा खालावला होता. सायंकाळी तेथील हवा गुणवत्ता निर्देशांक २११ इतका म्हणजेच ‘वाईट’ नोंदला गेला. तेथील हवेत आरोग्यास हानिकारक असणाऱ्या पीएम २.५ आणि पीएम १० चे प्रमाण सर्वाधिक होते.
शहरातील सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक सातत्याने ‘मध्यम’ श्रेणीत नोंदला जात असल्याने हवामान तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच हवा प्रदूषणामुळे नागरिकांना आरोग्यविषयिक समस्यांनाही सामोरे जावे लागत असून त्यामुळे श्वसनासंबंधी आजारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत फेब्रुवारी महिन्यात शहराची सरासरी हवा केवळ एकदाच ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदली गेली आहे.
‘मध्यम’ श्रेणीतील हवा कुठे ?
समीर ॲपच्या नोंदीनुसार, रविवारी वांद्रे कुर्ला संकुल येथील हवा गुणवत्ता निर्देशांक १८८ इतका होता. चकाला (अंधेरी पूर्व ) १६९, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ १६१, देवनार १५०, मालाड पूर्व १६६, माझगाव १५४, सिद्धार्थ नगर (वरळी) १३४, कुर्ला १३६, भायखळा ११७, नेव्ही नगर (कुलाबा) १४९ तर घोटकोपर येथील हवा गुणवत्ता निर्देशांक १३१ इतका होता. तसेच बहुतांश भागातील हवा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली. केवळ पवई, मुलूंड पूर्व, भांडुप पश्चिम आणि बोरिवली पूर्व येथील हवाच ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदली गेली.
मुंबईत पारा ३५ अंशावर
मुंबईसह कोकण पट्ट्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून कमाल तापमानात वाढ होत आहे. यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. रविवारीही हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३३ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात ३५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, सोमवारीही कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस इतके राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

